- अंबादास गवंडीपुणे : प्रवाशांना अचानक उद्भवणाऱ्या अडचणींमुळे कन्फर्म रेल्वे तिकीट असूनही प्रवास करणे टाळले जाते. त्यामुळे तिकीट रद्द करताना तिकिटाच्या एकूण रकमेतून नियमानुसार रेल्वेकडून दंड आकारला जातो आणि नंतर प्रवाशांना रक्कम परत दिली जाते.
पुणे रेल्वे विभागात एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ या सहा महिन्यांत रद्द तिकिटातून ३८ कोटी १७ लाख रुपयांचे महसूल मिळाले आहे. त्याच काळात मागील आर्थिक वर्षात ३६ कोटी ९५ लाख रुपये झाले होते. यंदा तिकीट रद्द करण्याच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे उत्पन्नात ४ टक्के वाढ झाली असून, त्यामुळे रेल्वेला फायदा होत आहे.
मध्य रेल्वे विभागातील पुणे रेल्वे विभाग हा महत्त्वाचा विभाग आहे. पुणे विभागातून दररोज २०० पेक्षा जास्त रेल्वे धावतात. त्यापैकी ७७ रेल्वे गाड्या पुण्यातून सुटतात. शिवाय, पुणे स्थानकावरून दररोज साडेदोन लाख प्रवासी प्रवास करतात.
पुण्यातून उत्तरेकडे जाणाऱ्या व इतर लांब पल्ल्याच्या गाड्यांना नेहमीच गर्दी असते. त्यामुळे नागरिक दोन महिने अगोदरच तिकीट आरक्षित करतात. मात्र, अचानक उद्भवणाऱ्या काही अडचणींमुळे काही प्रवाशांना ऐनवेळी तिकीट रद्द करावे लागते. त्यामुळे तिकीट रद्द करण्याच्या वेळेनुसार प्रवाशांचे पैसे कापले जातात. आता रेल्वेने तिकीट बुकिंगची मर्यादा दोन महिन्यांवर आणली आहे. त्याच वेळी कन्फर्म तिकीट रद्द करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते, ज्यामुळे रेल्वेला फायदा होत आहे.
असा आहे नियम?
- रेल्वे बोर्डाने ठरविलेल्या नियमानुसार दंडाच्या स्वरूपात पैसे वजा केले जातात. हा दंड तिकिटाचा प्रकार, रद्द करण्याचा वेळ आणि इतर अटींवर अवलंबून असतो.
- ४८ तासांपेक्षा कमी, पण १२ तासांपेक्षा जास्त रद्द केल्यास २५ टक्के आणि जीएसटीसहित रक्कम वजा केली जाते.
- १२ तासांपेक्षा कमी वेळ व गाडी सुटण्याच्या चार तासांपूर्वी रद्द केल्यास ५० टक्के आणि जीएसटीसहित रक्कम वजा केली जाते.
- रेल्वे सुटण्यास चार तासांपेक्षा कमी वेळ असेल, तर तिकीट रद्द करता येत नाही आणि तिकीटाचे पैसे परत मिळत नाहीत.
असा आकारला जातो दंड (कन्फर्म तिकीट ४८ तास आधी रद्द केल्यास):
- स्लिपर : ६० रुपये
- एसी थ्री टिअर : १८० रुपये
- एसी टू टिअर : २०० रुपये
- एसी फर्स्ट क्लास : २४० रुपये
महत्त्वाचे:
- वेटिंग तिकीट तत्काळ रद्द केल्यास सर्व्हिस चार्ज वजा केला जातो.
- तत्काळ कन्फर्म तिकीट रद्द केल्यास परतावा मिळत नाही.
- ई-तिकीट फक्त ऑनलाइनच रद्द करता येतो.
- ट्रेन सुटण्याच्या चार तासांपूर्वी कन्फर्म ई-तिकीट रद्द करता येते.
अशी आहे आकडेवारी :
वर्ष ---- उत्पन्न
एप्रिल ते ऑक्टोबर २०२४ -- ३६ कोटी ९५ लाख
एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ -- ३८ कोटी १७ लाख
प्रवाशांनी तिकीट बुक करून ठेवल्यानंतर प्रवास करण्यास अडचणी आल्यास तिकीट आधीच रद्द करावे. त्यामुळे दंड कमी आकारला जातो. ऐनवेळी तिकीट रद्द केल्यास दंडाची रक्कम जास्त असते, ज्यामुळे प्रवाशांचा तोटा होतो. याचा विचार प्रवाशांनी करावा. - आनंद सप्तर्षी, सदस्य, विभागीय रेल्वे सल्लागार समिती
Web Summary : Railway earns ₹38 crore from canceled tickets in six months. Increased cancellations led to a 4% revenue boost. Passengers cancel due to emergencies, incurring charges based on cancellation time. Rules dictate deductions, benefiting railways.
Web Summary : छह महीनों में रद्द टिकटों से रेलवे को ₹38 करोड़ का राजस्व मिला। रद्द करने में वृद्धि से 4% राजस्व वृद्धि हुई। यात्रियों को आपात स्थिति के कारण रद्द करना पड़ता है, जिससे रद्द करने के समय के आधार पर शुल्क लगता है। नियमों से रेलवे को लाभ होता है।