प्रवाशांनी रद्द केलेल्या तिकिटांतून पुणे रेल्वे विभागाला ६२ कोटींचे उत्पन्न; उत्पन्नामध्ये २४ टक्क्यांनी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 13:53 IST2025-05-10T13:52:59+5:302025-05-10T13:53:33+5:30
यंदा तिकीट रद्द करण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याने उत्पन्नात २४ टक्के वाढ झाली असून, त्यामुळे रेल्वेला फायदा होत आहे.

प्रवाशांनी रद्द केलेल्या तिकिटांतून पुणे रेल्वे विभागाला ६२ कोटींचे उत्पन्न; उत्पन्नामध्ये २४ टक्क्यांनी वाढ
पुणे : प्रवाशांकडून काही वेळा ऐनवेळी नियोजित प्रवास रद्द करण्यात येतो. त्यामुळे कन्फर्म तिकीट रद्द करण्यात येते. त्यामुळे त्यांना तिकिटासाठी आकारलेल्या एकूण तिकीट रकमेतून नियमानुसार पैसे कट करण्यात येतात. पुणे रेल्वे विभागातून गेल्या आर्थिक वर्षात प्रवाशांनी रद्द केलेल्या तिकिटातून ६२ कोटी ७० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर मागील २०२३-२४ या वर्षात ५० कोटी ४८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा तिकीट रद्द करण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याने उत्पन्नात २४ टक्के वाढ झाली असून, त्यामुळे रेल्वेला फायदा होत आहे.
मध्य रेल्वे विभागातील पुणे रेल्वे विभाग हा महत्त्वाचा विभाग आहे. पुणे विभागातून दररोज दोनशे रेल्वे धावतात. त्यामध्ये ६० पेक्षा जास्त गाड्या या पुण्यातून सुटतात. शिवाय दैनंदिन पावणेदोन लाख प्रवासी पुण्यातून प्रवास करतात. पुण्यातून उत्तरेकडे जाणाऱ्या व इतर लांब पल्ल्याच्या गाड्यांना नेहमीच गर्दी असते. त्यामुळे नागरिक दोन ते तीन महिने अगोदरच रेल्वे तिकिटाचे आरक्षण करून ठेवतात. परंतु, अचानक उद्भवणाऱ्या काही अडचणींमुळे काही प्रवाशांना ऐनवेळी तिकीट रद्द करावे लागते. त्यामुळे तिकीट रद्द केलेल्या वेळेनुसार प्रवाशांचे पैसे कट करून घेतले जातात. आता रेल्वेने तिकीट बुकिंगची मर्यादा दोन महिन्यांवर आणली आहे. त्याच वेळी कन्फर्म तिकीट रद्द करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे रेल्वेला फायदा होत आहे.
असा आहे नियम?
रेल्वे बोर्डाने ठरविलेल्या नियमानुसार दंडाच्या स्वरूपात पैसे वजा केले जातात. हा दंड तिकिटाचा प्रकार, रद्द करण्याची वेळ व इतर अटींवर अवलंबून असतो. ४८ तासांपेक्षा कमी, पण १२ तासांपेक्षा जास्त असल्यास २५ टक्के आणि जीएसटीसह रक्कम वजा केली जाते. १२ तासांपेक्षा कमी वेळ आणि गाडी सुटण्याच्या चार तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास ५० टक्के आणि जीएसटीसह रक्कम वजा केले जातात. तर रेल्वे सुटण्यास चार तासांपेक्षा कमी वेळ असेल, तर तिकीट रद्द करता येत नाही. त्यामुळे तिकिटाचे पैसे परत मिळत नाहीत.
असा आकारला जातो दंड : (कन्फर्म तिकीट ४८ तास आधी रद्द केल्यास)
स्लिपर : ६० रुपये
एसी थ्री टिअर : १८० रुपये
एसी टू टिअर : २०० रुपये
एसी फर्स्ट क्लास : २४० रुपये
महत्त्वाचे :
- वेटिंग तत्काळ तिकीट रद्द केल्यास सर्व्हिस चार्ज वजा केला जातो.
- तत्काळ कन्फर्म तिकीट रद्द केल्यास परतावा मिळत नाही.
- ई-तिकीट केवळ ऑनलाइनच रद्द करता येते.
- ट्रेन सुटण्याच्या चार तास अगोदर कन्फर्म ई-तिकीट करता येते रद्द.
प्रवाशांनी तिकीट रद्द केल्यावर रेल्वेकडून आकारले जाणारे शुल्क जास्त आहे. शिवाय क्षमता कमी असताना मोठ्या प्रमाणात वेटिंगचे तिकीट दिले जाते. नंतर जीएसटी व इतर शुल्क कापून घेतले जाते. त्याचा तोटा प्रवाशांना होतो.
- हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप