आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या झगमगाटात नागरिकांचा जीव धोक्यात..! पुरंदरमधील रस्ते सायकलपटूंना ‘रेस ट्रॅक’
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 16:03 IST2025-12-28T16:02:04+5:302025-12-28T16:03:13+5:30
काळाकुट्ट, गुळगुळीत डांबर आणि पांढरे पट्टे एवढ्यावरच बांधकाम विभाग थांबल्याने ‘स्पर्धकांसाठी रस्ते, पण नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा’ अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या झगमगाटात नागरिकांचा जीव धोक्यात..! पुरंदरमधील रस्ते सायकलपटूंना ‘रेस ट्रॅक’
भरत निगडे
नीरा : आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या झगमगाटासाठी पुरंदर तालुक्यातील रस्त्यांना रंगरंगोटी व डांबरीकरण करण्यात आले असले, तरी या रस्त्यांवरून दररोज प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांच्या जीवित सुरक्षेकडे प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. काळाकुट्ट, गुळगुळीत डांबर आणि पांढरे पट्टे एवढ्यावरच बांधकाम विभाग थांबल्याने ‘स्पर्धकांसाठी रस्ते, पण नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा’ अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
पुणे जिल्ह्यात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी पुरंदर तालुक्यातील रस्त्यांच्या डागडुजी व सुशोभीकरणावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात येत आहे. मात्र या सर्व खर्चात वाहतूकसुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा घटक पूर्णपणे दुर्लक्षित राहिल्याचे स्पष्ट दिसून येते. स्टेज २ मध्ये पुणे–पुरंदर–राजगड–हवेली तर स्टेज ३ मध्ये पुरंदर–बारामती मार्गे सायकली धावणार असून, या स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक अंतर पुरंदर तालुक्यातून जाणार आहे.
पुरंदर तालुक्यातील नीरा शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बुवासाहेब चौक या अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर नुकतेच पांढरे पट्टे ओढण्यात आले आहेत. मात्र या रस्त्यावर एकही ‘झेब्रा क्रॉसिंग’ नसल्याने पादचाऱ्यांसाठी हा रस्ता जीवघेणा ठरत आहे. याच मार्गावरून शाळकरी मुले, वृद्ध नागरिक, महिला तसेच खरेदीसाठी येणारे नागरिक मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. तरीही त्यांच्या सुरक्षिततेसाठी साधी तजवीज करण्याचे औदार्यही बांधकाम विभागाने दाखवलेले नाही.
“हा रस्ता नेमका कुणासाठी?” असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. हा रस्ता जणू धनिकांच्या सायकली सुसाट पळवण्यासाठीच तयार केल्यासारखा भासतो, तर सामान्य नागरिक, गोरगरीब व पादचारी यांच्यासाठी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याचे चित्र आहे.
तालुक्यातील दोन महत्त्वाचे घाट तसेच ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर केवळ वरवरची, तकलादू मलमपट्टी करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. सध्या रस्ते गुळगुळीत आणि काळेभोर दिसत असले, तरी ऐन उन्हाळ्यात हे डांबर उखडून रस्त्यांची दुरवस्था होण्याची दाट शक्यता जाणकार बांधकाम व्यावसायिक व्यक्त करत आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे, या रस्त्यांवर तीव्र चढ-उतार, धोकादायक वळणे, पुढे गाव आहे, शाळा आहे, वेगमर्यादा आदी कोणतेही सूचना फलक दिसून येत नाहीत. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेच्या नावाखाली किमान आंतरराष्ट्रीय दर्जाची रस्ता सुरक्षा मानके तरी पाळली जाणार नाहीत का, असा सवाल उपस्थित होत आहे.
कोट्यवधींचा निधी खर्च करूनही जर नागरिकांचा जीव सुरक्षित राहणार नसेल, तर अशा विकासाचा उपयोग तरी काय, असा संतप्त प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत. पुढील काळात तरी प्रशासन व बांधकाम विभागाने जागे होऊन रस्त्यांवर आवश्यक सर्व वाहतूक सुरक्षेची साधने तातडीने उपलब्ध करून द्यावीत, अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावरच राहील, अशी तीव्र भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
टेपर रस्त्यावरून सायकलपटूंना कसरत
पुरंदर तालुक्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या पालखी मार्गावरील पिसुर्टी फाटा ते नीरा हा पूर्वी अरुंद असलेला रस्ता मध्यंतरी साईडपट्टीत मुरुम भरून तकलादू पद्धतीने डांबरीकरण करण्यात आला. आता दोन वर्षांनंतर हा रस्ता वाहतुकीसाठी अधिकच धोकादायक बनला आहे. रस्त्याच्या मध्यभागाच्या तुलनेत साईडपट्टी तब्बल दोन फूट खाली असल्याने एका वाहनाचे उजवे व डावे चाक वेगवेगळ्या पातळीवरून चालते. परिणामी अवजड वाहन चालवताना चालकाला मोठी कसरत करावी लागते. अशा टेपर रस्त्यावरून सायकल पळवताना आंतरराष्ट्रीय सायकलपटूंनाही मोठी कसरत करावी लागणार आहे.