पुणेकरांचा जीवमुठीत धरून प्रवास..! रेडझोनमध्ये पोलिस, महसूल अन् आरटीओच्या नाकावर टिच्चून जड वाहतूक सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 16:32 IST2026-02-06T16:31:57+5:302026-02-06T16:32:39+5:30
- डेक्कन वाहतूक पोलिस निरीक्षकाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह?

पुणेकरांचा जीवमुठीत धरून प्रवास..! रेडझोनमध्ये पोलिस, महसूल अन् आरटीओच्या नाकावर टिच्चून जड वाहतूक सुरूच
- संजय चिंचोले
पुणे : डेक्कन पोलिस स्टेशन अंतर्गत रेडझोनमध्ये सर्व प्रकारच्या जडवाहनांना बंदी असतानाही या भागातील चिंचोळ्या रस्त्यांवर जड वाहतूक सुरूच आहे. त्यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. तसेच अपघाताचा धोकादेखील वाढला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे गेल्याच महिन्यात दोन वाहनचालकांवर गुन्हे दाखल केले. सूचनाफलक लावले असे असतानाही पोलिसांच्या नाकावर टिच्चून जडवाहनांची घुसखोरी सुरूच आहे. विशेषतः शहरात अनधिकृतपणे ये-जा करणाऱ्या जडवाहनांवर कारवाईसाठी पोलिस, महसूल व आरटीओचे भरारी पथक तैनात आहे. मात्र खुलेआम जडवाहने धावत आहेत.
डेक्कन शहर वाहतूक पोलिस ठाण्यांतर्गत महाराष्ट्र विज्ञानवर्धनी आघारकर संशोधन संस्था, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, जंगली महाराजरोड, फर्ग्युसन महाविद्यालय रोड, प्रभात रोड, आपटे रोड, एम. पी. विधि महाविद्यालय, चंद्रकांत दरोडे माध्यमिक व पूर्व तसेच प्राथमिक विद्यालय, दादासाहेब कुदळे मार्ग, बीएमसीसी महाविद्यालय, गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था व स्टाफ क्वार्टर्स, वा. गो. काळे मार्ग, खांडेकर चौक, सेनापती बापटरोड, आयएलएस विधि महाविद्यालय, भांडारकर संस्था, फिरोदिया वस्तीगृह, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आचार्य जैन ऋषीजी जैन मुलींचे वसतिगृह, चंद्रकांत दरोडे विद्यालय, महावीर जैन विद्यालय, छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण व मानव विकास संस्था, महात्मा फुले महाविद्यालय, दादासाहेब दरोडे व विश्वानंद पाषाण सभागृह, होमगार्ड कार्यालय, सिम्बायोसिस, अनेक हिरवाई जाॅगिंग पार्क व महापालिका उद्यान तसेच सूचीर, नंदादीप, क्षितिज, भाग्यश्री, रायगड, सह्याद्री, सिंहगड, आम्रपाली, खाडीलकर बंगला, जय जयवंती सारख्या अनेक निवासी वसाहती, सरकारी व निमसरकारी तसेच खासगी कार्यालये, बँका व निवासी वसाहतीला लागून असलेल्या विधी महाविद्यालय ते बीएमसी महाविद्यालय या चिंचोळ्या मार्गावर जड वाहनांसाठी रेड झोन घोषित केलेला आहे.
पोलिस उपायुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन
दि. ५ फेब्रुवारी २००५ रोजी शहर वाहतूक शाखेचे एका तत्कालीन पोलिस उपायुक्तांनी पुणे शहरातील वाहतुकीचे नियोजन, संभाव्य अपघात व वाहतुक कोंडी टाळण्यासाठी व पुणेकरांचा त्रास कमी व्हावा याकरिता जडवाहतुकीस बंदी आदेश जारी केलेला आहे. जडवाहनांवर नजर ठेवण्यासाठी भरारी पथक देखील स्थापन केलेले असताना अद्याप वाहनांची ये-जा सुरूच आहे.
गुन्हे दाखल ; पाट्या लावल्या तरीही घुसखोरी
धक्कादायक बाब म्हणजे दि. २० डिसेंबर २०२५ रोजी डेक्कन भागातील फर्ग्युसन महाविद्यालय मार्गावर जडवाहनांमुळे वाहतुकीची कोंडी झाल्याची बाब अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, शहर वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलिस आयुक्त नंदीनी बंग्यानी यांच्या निदर्शनास नागरिकांनी आणून दिल्यानंतर त्याच दिवशी डेक्कन वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकांनी दोन हायवा चालकांवर गुन्हे दाखल केले होते.
यानंतर उशिरा शहाणपण सुचलेल्या शहर वाहतूक शाखेच्या वतीने डेक्कन भागात मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर जडवाहनास बंदी असल्याच्या पाट्या लावलेल्या असताना भरदिवसा सकाळी साडेदहाच्या सुमारास वाहतुककोंडीत भर टाकत जड वाहनांची घुसखोरी सुरूच असल्याने शहर वाहतूक शाखेच्या वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
ही आहेत कारणे
पोलिस उपायुक्तांच्या लेखी आदेशाचे उल्लंघन करत भरदिवसा खासगी जडवाहने शहरात प्रवेश करतात. त्याकडे शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी व अधिकारी डोळेझाक करतात. याचे कारण शहरात आजी-माजी आमदार - खासदार व इतर लोकप्रतिनिधींच्या प्रकल्पांसाठी तसेच काही राजकारण्यांचे हितचिंतक असलेल्या अनेक बड्या बिल्डरांच्या प्रकल्पांची बांधकाम सुरू आहेत. त्यांचा शहर वाहतूक शाखेशी अर्थपूर्ण संबंध असल्याचा संशय पुणेकरांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर राजकीय दबाव असल्यानेच बंदी कळात जडवाहने शहरात रेडझोनमध्ये घुसखोरी करत आहेत.
आरटीओचे वायुवेग पथक ‘हवेत’
पुणे शहरात जडवाहनांबरोबरच प्रवासी वाहतूक करणार्या बहूतांश रिक्षाचालकांकडे देखील वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) नाही. परिणामी प्रवाशांवर अपघाताचे मोठे दुहेरी संकट उभे ठाकले आहे. प्रवाशांची सुखरूप वाहतूक करण्यासाठी वाहनधारकांनी वाहन योग्यता प्रमाणपत्र काढणे गरजेचे आहे. मात्र शहरात प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे तैनात केलेले वायुवेग पथक रस्ते वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या, कर थकवणाऱ्या आणि विना फिटनेस धावणाऱ्या वाहनांवर तसेच शहरातील सार्वजनिक प्रवासी वाहतुकीच्या ठिकाणांवरून प्रवाशांची पळवापळवी करणाऱ्यांवर कारवाई करताना कुठेही दिसत नाही.
परिणामी शहरात अवैध बस, टिप्पर आणि जडवाहनांवर कारवाईच होत नसल्याने चालकांची हिंमत वाढली आहे. मागील अडीच वर्षात शहरात वाढलेले अपघात, त्यामुळे बळी गेलेल्यांची आकडेवारी आणि वाढलेल्या जखमींची संख्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची संख्या पाहता हे प्रकार रोखण्यासाठी तैनात केलेले वायुवेग पथक हवेत असल्याचे दिसते.
महसूल विभागाचे भरारी पथक फरार
शहरात अनेक प्रकल्पांवर मर्यादेपेक्षा अधिक खोदकाम केल्याने आसपासच्या रहिवाशांच्या घरांना भेगा पडत आहेत. आवाजांनी घरातील भांडे पडून जेष्ठनागरिक आजारी रुग्णांची झोप मोड होत आहे. निवासी झोनमध्ये रात्री खोदकामाला बंदी असताना पुण्यात सगळीकडे बेकायदेशीर खोदकाम आणि गौण खनिजाची वाहतूक सुरू आहे. महसूल विभागाच्या भरारी पथकात महसूल अधिकाऱ्यांसह महापालिका, शहर वाहतूक शाखा व पोलीस आणि इतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असतो. पण हे भरारी पथक देखील फरार झाल्याने शहरात विकासकांची मनमानी सुरू आहे. शहरात सरकारी कामाचे फलक लावून काही खासगी वाहनांची घुसखोरी रोखण्यासाठी महापालिका, आरटीओ, पोलिस आणि शहर वाहतूक शाखेच्या भरारी पथकाने रस्त्यावर उभे राहून कागदपत्रांची तपासणे गरजेचे