‘पोर्श’कार अपघात प्रकरण; विशाल अगरवालसह ९ आरोपींचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 19:52 IST2025-12-16T19:51:06+5:302025-12-16T19:52:09+5:30
कल्याणीनगर भागात ‘पोर्श’ कार भरधाव वेगाने चालवून अल्पवयीन मुलाने दोन तरुणांना उडविले.

‘पोर्श’कार अपघात प्रकरण; विशाल अगरवालसह ९ आरोपींचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला
पुणे : अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी आरोपींकडून साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याबरोबरच पुराव्यामध्ये छेडछाड करण्याची शक्यता आहे, ही बाब विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी निदर्शनास आणून दिल्याने विशाल अगरवाल त्याच्यासह ९ आरोपींचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळला.
कल्याणीनगर भागात ‘पोर्श’ कार भरधाव वेगाने चालवून अल्पवयीन मुलाने दोन तरुणांना उडविले. या प्रकरणात गुन्हेगारी कट रचणे, पुरावे नष्ट करणे आणि रक्ताचे नमुने बदलणे या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. यात मुलाचे आई-वडील विशाल व शिवानी अगरवाल, अरुणकुमार सिंग, अश्पाक मकानदार, अमर गायकवाड, आदित्य सूद, आशिष मित्तल, अतुल घटकांबळे, ससूनच्या आपत्कालीन विभागाचा तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर आणि न्यायवैद्यक विभागाचा तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपींची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. या प्रकरणात अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल हिला महिला असल्याकारणाने मुंबई उच्च न्यायालयाने आधीच अंतरिम जामीन दिला आहे.
दरम्यान, पाच महिन्यांपूर्वी विशाल अगरवाल याने आई आजारी असल्याने तात्पुरता जामीन मिळण्यासाठी केलेला अर्जही पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे विशाल अगरवाल याच्यासह उर्वरित नऊजणांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. मात्र, शिशिर हिरे व शुभम जोशी यांनी उच्च न्यायालयात सरकारी पक्षाची बाजू मांडली. रक्ताचे नमुने बदलून आरोपींनी गंभीर गुन्हा केला आहे. आरोपींना जामीन दिल्यास ते पुराव्यात छेडछाड करू शकतात, असे शिशिर हिरे यांनी न्यायालयास पटवून दिले.