Pune Police: तलवारीने केक कापणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर; भरचौकात ‘बर्थ डे’चा धिंगाणा बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 13:14 IST2022-04-03T13:13:58+5:302022-04-03T13:14:07+5:30
पुणे : मध्यरात्रीच्या सुमारास चौकात मित्रांची टोळकी जमवून मोठ्या आवाजात गाणी लावून बाराच्या ठोक्याला भाईच्या हॅपी बर्थ डेचा जल्लोष ...

Pune Police: तलवारीने केक कापणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर; भरचौकात ‘बर्थ डे’चा धिंगाणा बंद
पुणे : मध्यरात्रीच्या सुमारास चौकात मित्रांची टोळकी जमवून मोठ्या आवाजात गाणी लावून बाराच्या ठोक्याला भाईच्या हॅपी बर्थ डेचा जल्लोष शहरातील रस्त्यांवर पूर्वी नेहमीच दिसायचा. एकामागोमाग ठेवलेले केक हा भाई तलवारीने कापत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले जात. त्यातून परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला जात होता. शहर पोलिसांनी अशा गुंडांना वेचून त्यांच्यावर कारवाई केल्याने आता चौकांमधील हा धिंगाणा बंद झाला आहे.
काही वर्षांपूर्वी पुण्यातील एका उड्डाण पुलावर असाच मध्यरात्री काही जण बर्थ डे साजरा करत होते. त्यावेळी गस्तीवर असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना अटकाव केला. तेव्हा त्याने मी कोण आहे, याची माहिती आहे का असे म्हणत आपला रुबाब दाखविण्याचा प्रयत्न केला. या महिला अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचे जोरदार स्वागत झाले होते. अशाच प्रकारे शहराच्या वेगवेगळ्या भागात तलवारीने वाढदिवसाचे केक कापून त्याचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकले जातात. त्यातून गुंडाची दहशत पसविली जात असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या लक्षात आले. त्यांनी अशा प्रकारे दहशत पसरविणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले.
गुन्हे शाखेतील पाचही युनिटने त्यांच्या भागात अशा प्रकारे भररस्त्यात बर्थ डे साजरा करून तलवारीने केक कापणाऱ्यांवर आणि सोशल मीडियावर नजर ठेवली. अशा प्रकारे तलवारीने केक कापणाऱ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यातून अनेक गुंडांना व त्यांच्या साथीदारांवर आर्म ॲक्टखाली गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली गेली.
३ डझन गुंड आत
शहरातील वेगवेगळ्या भागात रस्त्यावर तलवारीने केक कापून त्याचे फोटो स्टेट्सला ठेवणाऱ्या जवळपास ३ डझन गुंडांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. समीर ढमाले याने भररस्त्यात वाढदिवस साजरा करताना तलवारीने केक कापला होता. त्यानंतर तो फोटो त्याने अपलोड करून स्टेट्सला ठेवला होता. पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून २६ इंच लांबीचे दुधारी पाते व ६ इंच लांब नक्षीदार मूठ असलेली तलवार जप्त केली होती.
येरवडा, शास्त्रीनगर, सातारा रोड, रविवार पेठ, कसबा पेठ, शिवाजीनगर परिसरात भरचौकात बर्थ डे केक कापून धिंगाणा घालणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली.