खाकीवर्दीतली माणुसकी : जखमी अवस्थेत जीवाभावाचा मित्र पळाला पण पोलीस ठरले देवदूत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 15:47 IST2019-01-02T15:44:40+5:302019-01-02T15:47:44+5:30
मित्राबरोबर नववर्षाच्या आनंद साजरा करुन ते दोघे मोटारसायकलवरुन घरी निघाले होते़ पण, वाटेत त्यांची मोटारसायकल घसरली व मागे बसलेला मित्र जबर जखमी झाला़ .

खाकीवर्दीतली माणुसकी : जखमी अवस्थेत जीवाभावाचा मित्र पळाला पण पोलीस ठरले देवदूत
पुणे : मित्राबरोबर नववर्षाच्या आनंद साजरा करुन ते दोघे मोटारसायकलवरुन घरी निघाले होते़ पण, वाटेत त्यांची मोटारसायकल घसरली व मागे बसलेला मित्र जबर जखमी झाला़ . मात्र या अवस्थेत त्याचा साथीदार त्याला तसाच सोडून निघून गेला़. त्यावेळी येणारे जाणारे त्याला जखमी अवस्थेत पाहूनही निघून जात होते़. त्याच्या पायाच्या मांडीचे हाड फॅक्चर झाले होते़. त्याचा खूप रक्तस्त्रावही होत होता़.
नववर्षाची रात्र जणू त्याच्यासाठी काळरात्र बनू पहात होती़. पण त्याचवेळी गस्तीवरील पोलीस पथक तेथे आले़. त्यांनी तात्काळ हालचाल करत १०८ वरुन अॅब्युलन्स मागविली़ . त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करुन त्याच्या नातेवाईकांना कळविले़. हे काम करणारे उत्तरनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक के़ के़ कांबळे, हवालदार सूर्यवंशी, सहायक फौजदार वाळके आणि वायदंडे हे त्याच्यासाठी जणू देवदूतच ठरले़.
आदर्श गावडे (वय ३१, रा़ न्यू कोपरेगाव) असे या जखमी तरुणाचे नाव आहे़. तो व त्याचा मित्र मद्यपान करुन घरी जात होते़. शिवणेतील नवभारत हायस्कुल चौकात मध्यरात्री साडेबारा वाजता त्यांची मोटारसायकल घसरली होती़. त्याचा मित्र गावडे यांना जखमी अवस्थेत तेथेच सोडून गेला होता़. मात्र पोलिसांनी वेळेवर केलेल्या मदतीमुळे त्याला तात्काळ उपचार मिळू शकले़ .