Pune Rape Case Update: पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी दत्तात्रय रामदास गाडेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून फरार असलेल्या दत्तात्रय गाडेला शिरूर तालुक्यातील गुणाट गावातून मध्यरात्री दोनच्या सुमारास अटक करण्यात आली. फरार असलेल्या दत्तात्रय गाडेला पकडून देणाऱ्याला पुणे पोलिसांनी १ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. त्यानंतर आता पुणे पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन हे एक लाखांचे बक्षीस कोणाला देणार याची माहिती दिली.
स्वारगेट बसस्थानकातील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला शुक्रवारी मध्यरात्री शिरुरमधून अटक करण्यात आली. आरोपीला पकडण्यासाठी ५०० पोलिसांकडून त्याचा शोध घेत होती. गाडेला पकडून देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. दत्तात्रय गाडेला अटक केल्यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या कारवाईबाबत माहिती दिली. गुणाट गावच्या गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला अटक केली.
रात्री साडेदहाच्या सुमारास दत्ता गाडेला तहान लागल्यानं तो त्याच्या नातेवाईकांच्या घरी गेला. त्यांच्याकडून पाण्याची बाटली घेऊन मी पोलिसांना शरण जाणार आहे असे सांगून तो निघून गेला. त्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना गाडेची माहिती दिली. पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने पुन्हा गाडेचा शोध सुरू केला. गावकऱ्यांकडूनही गाडेला पोलिसांच्या स्वाधीन होण्याचे आवाहन करण्यात येत होते. शेवटी तपासादरम्यान, दत्तात्रय गाडे पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
या कारवाईनंतर गावकऱ्यांनी आरोपीला पकडण्याचा दावा केला जात आहे. याबाबत बोलताना गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केल्याचे पोलिसांनी म्हटलं. यावेळी पोलीस आयुक्तांना एक लाखाचे बक्षीस कोणाला मिळणार असा सवाल विचारण्यात आला. त्यावर अमितेश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली.
"एक लाखाचे बक्षीस हे सर्वात शेवटी ज्यांनी माहिती दिली त्यांना दिले जाणार आहे. गाडेची शेवटची माहिती तो जिथे पाणी मागण्यासाठी गेला होता त्यांनी दिली. त्यानंतर मोटारसाईकल आणि ट्रोनच्या मदतीने त्याची दिशा कळली आणि त्याला अटक करण्यात आली. शेवटी ज्यांनी माहिती दिली त्यांना हे एक लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे," अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.