मैदानात हजारो उमेदवार पण निवड होणार मोजक्यांचीच... ! पुण्यात पोलीस भरतीला सुरुवात
By किरण शिंदे | Updated: February 17, 2026 11:09 IST2026-02-17T11:08:21+5:302026-02-17T11:09:30+5:30
ही भरती प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.

मैदानात हजारो उमेदवार पण निवड होणार मोजक्यांचीच... ! पुण्यात पोलीस भरतीला सुरुवात
पुणे -पुणे शहर पोलीस दलातील विविध पदांसाठी भरती प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. या भरती प्रक्रियेतील १६३३ पदांसाठी तब्बल १ लाख ८५ हजार उमेदवारांनी अर्ज केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पोलीस अंमलदार, १०५ वाहनचालक, ३३ पोलीस बँड कर्मचारी अशा एकूण १६३३ पदांचा समावेश आहे. याशिवाय कारागृह पोलीसांच्या १३० पदांसाठी देखील भरती केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया आरएफआयडी तंत्रज्ञान आणि सीसीटीव्हीच्या निगरानीत पार पडणार आहे.
मैदानी चाचणीचे आयोजन पुणे शहर पोलीस मुख्यालय तसेच राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक २ यांच्या मैदानावर करण्यात आले आहे. मैदानी व शारीरिक चणीनंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. शारीरिक चाचणीत उंची मोजणी, १०० मीटर धावणे, १६०० मीटर धावणे (महिलांसाठी ८०० मीटर) आणि गोळाफेक या घटकांचा समावेश आहे.
या चाचणीसाठी १०० गुण निश्चित करण्यात आले असून किमान ५० गुण मिळवणे आवश्यक आहे. भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी संपूर्ण शारीरिक चाचणी आरएफआयडी प्रणाली आणि सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली घेतली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.