PUNE PMPML: आता ‘पीएमपी’ वर भरोसा नाय! अर्ध्या वाटेतच बस बंद, प्रवाशांचा मनस्ताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 11:44 IST2025-07-10T11:40:58+5:302025-07-10T11:44:27+5:30
ब्रेकडाऊनचे प्रमाण दिवसेंदिवस पुन्हा वाढल्याने प्रवाशांना अर्ध्या वाटेत दुसऱ्या बसची वाट पाहावी लागते

PUNE PMPML: आता ‘पीएमपी’ वर भरोसा नाय! अर्ध्या वाटेतच बस बंद, प्रवाशांचा मनस्ताप
पुणे : पुणेकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या ‘पीएमपी’चा प्रवास सुरळीत होईल की नाही, याचा भरोसा राहिला नाही. कारण, कमी झालेले ब्रेकडाऊनचे प्रमाण दिवसेंदिवस पुन्हा वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांना अर्ध्या वाटेत दुसऱ्या बसची वाट पाहावी लागते. मे आणि जून या दोन महिन्यांत तब्बल ४ हजार ३६९ बसच्या ब्रेकडाऊन झाले आहे. यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप, गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीच्या हद्दीत प्रवासी सेवा देण्यात येते. पीएमपीच्या दैनंदिन १ हजार ६०० बस मार्गावर धावतात. परंतु, यामध्ये जवळपास ६० पेक्षा जास्त बस दररोज ब्रेकडाऊन होत आहे. त्यामुळे प्रवाशांना निम्म्या वाटेत दुसऱ्या बसची वाट पाहावी लागते. मार्गावर धावणाऱ्या बसची देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे त्याचे प्रमाण वाढत आहे. प्रशासनाकडून ब्रेकडाऊन कमी करण्याचे वारंवार सांगण्यात येते. परंतु, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ब्रेकडाऊनमुळे शहरातील प्रत्येक रस्त्यावर दररोज दोन चार पीएमपी बस दिसत आहेत. त्यामुळं प्रवाशांची डोकेदुखी ठरत आहे. एकीकडे तिकीट दर वाढविण्यात आले असून, सेवा देण्यात पीएमपी अपयशी ठरत आहे.
ठेकेदारांच्या बस सुसाट
मार्गावर धावणाऱ्या एकूण खासगी बसपैकी दैनंदिन ७० टक्के खासगी ठेकेदारांच्या बस रस्त्यामध्ये बंद पडत आहेत. मे महिन्यात १ हजार ४०० आणि जूनमध्ये १ हजार ६९५ खासगी बसचे ब्रेकडाऊन झाले आहेत, तर स्वमालकीच्या दोन महिन्यांत १ हजार २७४ बसेसचे ब्रेकडाऊन झाले आहे. त्यामुळे ठेकेदारांच्या बससेवेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या ब्रेकडाऊनमुळे प्रवासी मात्र हतबल झाले आहेत.
अध्यक्षांकडून कारवाई; तरीही दुर्लक्ष
वाढत्या ब्रेकडाऊनमुळे गेल्या आठवड्यात पीएमपीच्या अध्यक्षांकडून कामचुकार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. शिवाय ब्रेकडाऊनचे प्रमाण कसे कमी करता, येईल याविषयी सक्त ताकीद देण्यात आली. यामध्ये ठेकेदारांबरोबर मीटिंग घेण्यात आली. तरीही रस्त्यावर बंद पडलेल्या बस दिसत आहेत.
गेल्या महिन्यात पीएमपीने तिकीट दर वाढविले. परंतु, प्रवाशांना सेवा देण्यात अपयश ठरत आहे. दैनंदिन प्रवासात ब्रेकडाऊन झाले, इंजिन बंद पडले या व इतर कारणाने बस बंद पडत आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देण्यात यावी. - प्रतीक्षा माळी, प्रवासी
पावसामुळे ब्रेकडाऊनचे प्रमाण मध्यंतरी वाढले होते. त्यामुळे मार्गावर बस सोडताना देखभाल दुरुस्ती करून सोडण्यात यावी, असे सक्त ताकीद देण्यात आली आहे. - राजेश कुदळे, मुख्य अभियंता, पीएमपी
अशी आहे आकडेवारी
महिना - स्वमालकी बस - ठेकेदारांच्या बस
मे - ......५६१................ - १४००
जून....... ७१३............... - १६९५