पीएमपीच्या रातराणी बसला प्रवाशांची पसंती; वर्षभरात एक कोटी रुपयांचे उत्पन्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 20:17 IST2025-04-15T20:17:45+5:302025-04-15T20:17:55+5:30
- गेल्या आर्थिक वर्षात एक कोटी रुपयांचे उत्पन्न, नव्या मार्गावर बस सुरू करण्याची मागणी

पीएमपीच्या रातराणी बसला प्रवाशांची पसंती; वर्षभरात एक कोटी रुपयांचे उत्पन्न
- अंबादास गवंडी
पुणे : पुण्यात रात्री येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. या प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) सहा मार्गांवर रातराणी बस सुरू असून, या बसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. रातराणीच्या सहा मार्गांवर धावणाऱ्या पीएमपीला गेल्या आर्थिक वर्षात एक कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आणखी काही मार्गांवर बस सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
राज्य आणि राज्याबाहेरील नागरिकांचे पुण्यात ये-जा करण्याचे प्रमाण जास्त आहे. शिवाय शिक्षण, आयटी हब, व्यावसायिकामुळे विमान, एसटी, रेल्वे, खासगी बसमधून प्रवास रात्री-अपरात्री पुण्यात येण्याचे प्रमाण जास्त आहे. या प्रवाशांची रिक्षाचालकांकडून मोठ्या प्रमाणात लूटमार केली जाते. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे पीएमपीकडून पाच मार्गावर रातराणी बस सुरू केली होती. या मार्गावर रात्रीच्या वेळी प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. पुढे प्रवाशांची मागणी व मार्गांचा अभ्यास करून पीएमपीने सहा मार्ग सुरू केले. त्यामध्ये पुणे स्टेशन ते निगडी हा नवीन मार्ग सुरू केला आहे. याचा प्रवाशांना फायदा होत असून, वर्षभरात सहा मार्गांवर एक कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
नव्या मार्गांची बसची गरज
रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांची संख्या पाहता पीएमपीकडून नव्या मार्गावर आणखी बस सुरू करण्याची आवश्यकता आहे. काही महिने मनपा ते खराडी, नतावाडी ते कोंढवा खुर्द असे दोन रातराणी मार्ग सुरू केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असतानाही ते बंद करण्यात आले आहेत. पीएमपीच्या ताफ्यात आता बसची संख्या वाढत आहेत. त्यामुळे नवे मार्ग सुरू केले तर प्रवाशांना फायदा होणार आहे.
विमानतळावरून हवी सेवा
रात्रीच्या वेळी पुणे विमानतळावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळे पुणे विमानतळ ते स्वारगेट, पुणे स्टेशन ते विमानतळ, पुणे स्टेशन ते हिंजवडी अशा मार्गांवर रातराणी बस सुरू केल्यास प्रवाशांना फायदा होणार असून, रिक्षा चालकांकडून होणारी लूट थांबेल. त्यामुळे या नवीन मार्गावर रातराणी बस सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
हे आहे ‘रातराणी’चे बस मार्ग
कात्रज ते शिवाजीनगर बसस्थानक, पुणे स्टेशन ते एनडीए गेट १०, हडपसर ते स्वारगेट, हडपसर ते पुणे स्टेशन, निगडी ते पुणे स्टेशन (वाकडेवाडीमार्गे), कात्रज ते पुणे स्टेशन
अशी आहे आकडेवारी :
एकूण मार्ग - सहा
होणाऱ्या फेऱ्या - सहा ते आठ
एक वर्षातील उत्पन्न - एक कोटी
पीएमपीकडून सहा मार्गांवर रातराणी बस सुरू आहेत, त्याला प्रवाशांचा प्रतिसाद चांगला आहे. नव्या बस आल्यावर काही मार्गावर रातराणी बस सुरू करण्याचे नियोजन आहे. -नितीन नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी