Pune Night Curfew : पुणेकरांनो, विनाकारण घराबाहेर पडत असाल तर सावधान; तब्बल ९६ ठिकाणी होऊ शकते अडवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 08:33 PM2021-04-03T20:33:38+5:302021-04-03T20:35:48+5:30

नागरिक घरात, पोलीस रस्त्यावर  ९६ ठिकाणी नाकाबंदी, घर जाण्यासाठी नागरिकांची घाई, रात्री रस्त्यावर शुकशुकाट

Pune Night Curfew : Pune citizens beware of falling out of the house for no reason; Inquiries will be held in 96 places | Pune Night Curfew : पुणेकरांनो, विनाकारण घराबाहेर पडत असाल तर सावधान; तब्बल ९६ ठिकाणी होऊ शकते अडवणूक

Pune Night Curfew : पुणेकरांनो, विनाकारण घराबाहेर पडत असाल तर सावधान; तब्बल ९६ ठिकाणी होऊ शकते अडवणूक

Next

पुणे : नोकरदार,छोटे मोठे व्यावसायिक, कर्मचारी अशा सर्वांची नजर शनिवारी घड्याळाच्या टिक टिकवर खिळलेली होती. जसा जसा तास काटा सहाच्या जवळ सरकत होता तसा दुकानदारांनी आवरायची लगबग सुरु झाली होती. तर दुसरीकडे चाकरमान्यांनी सहाच्या आत कसेही करून घर गाठायचंच हे अगदी मनोमन ठरवलं होतं. आणि घड्याळाचा काटा सहावर येऊन थबकला तसे बऱ्यापैकी पुणे थांबलं... रस्त्यावर शुकशुकाट जाणवू लागला. ठिकठकाणी पोलीस बंदोबस्त तैनात होता.

पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोरोनाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. या वेळी पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला. 

पुणे  शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनिवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून संचारबंदीची अंमलबजावणी लागू करण्यात आली. त्याचबरोबर शहरातील महत्वाच्या चौकात नाकाबंदी करुन पोलीस रस्त्यावर उतरले होते. संचारबंदीच्या घोषणेमुळे पुणेकरांनी अगोदरपासूनच काळजी घेऊन सायंकाळी ६ वाजण्यांच्या आत घरी पोहचण्या घाई शहरात सायंकाळी सर्वत्र दिसून येत होती. त्यामुळे उपनगरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. महापालिकेच्या आदेशात जोपर्यंत स्पष्टता येत नाही, तोपर्यंत कोणत्याही नागरिकांना त्रास होणार नाही, या काळजी पोलीस घेणार असून या गोष्टींकडे अधिक संवेदनशीलतेने पाहणार असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. 
शहरात सायंकाळी ६ वाजता संचारबंदी लागणार असल्याचे लक्षात घेऊन शहरातील व्यापारी, दुकानदार यांनी अगोदरच त्यादृष्टीने काळजी घेताना दिसून आले. सायंकाळी ६ वाजता बहुतांशी दुकाने बंद असल्याचे बाजारपेठांमध्ये फेरफटका मारल्यावर दिसून येत होते. 

शहरातील महत्वाच्या चौकात पोलिसांनी सायंकाळी ६ वाजल्यापासून नाकाबंदी सुरु केली. येणार्‍या जाणार्‍या वाहनचालकांना थांबून त्यांची चौकशी केली जात होती. त्यांची नावे लिहून घेतली जात होती. त्याचवेळी पोलीस व्हॅनवरुन अनाऊंसमेंट केली जात होती. नरपतगिरी चौक, संत कबीर चौक, दारुवाला पुल, जंगली महाराज रोड तसेच टिळक चौक अशा महत्वाच्या चौकांमध्ये बॅरिकेट लावून नाकाबंदी केल्याचे दिसून येत होते. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ ते ४ ठिकाणी अशा प्रकारे नाकाबंदी करण्यात आली आहे. पहिलाच दिवस असल्याने आज पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी वाहनचालकांना समजावून सांगण्यावर भर दिला होता.

पुणे रेल्व स्टेशनमध्ये प्रवाशांची गर्दी दिसून आली. एस टीला मात्र गर्दी दिसून आली नाही. नेहमी रात्रभर सुरु असणार्‍या टपर्‍या, हातगाड्या पूर्णपणे बंद झाल्या होत्या. परिसरातही लोकांची गर्दी कमी झाली होती. मात्र, त्याचवेळी कॅब, रिक्षा सुरु असल्याने बाहेरगावाहून येणार्‍यांना फारशी अडचण होताना दिसून आली नाही. 

सायंकाळच्या वेळी नेहमी फिरायला येणार्‍यांच्या तरुणतरुणींची विशेषत: शनिवार रविवार सायंकाळी जंगली महाराज रोड, फर्ग्युसन रोड ओसंडून वाहत असतो. मात्र, आज शनिवारी या ठिकाणी पूर्णपणे शुकशुकाट दिसून येत होता. फक्त काही वाहने ये जा करताना दिसत होती. त्यांनाही अडवून पोलीस चौकशी केल्यावरच पुढे सोडत होते. 

आज शनिवारची सुट्टी असल्याने शासकीय कार्यालये बंद होती. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी नेहमीपेक्षा कमी होती. जे वेगवेगळ्या कामांसाठी घराबाहेर पडले होते. तेही सायंकाळी ६ च्या आज घरी जाण्यासाठी घाई करीत होते. एकाचवेळी अंसख्य वाहने सिंहगड रोडवर आल्याने राजाराम पुलापासून पुढे सायंकाळी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येत होते. अशीच परिस्थिती सोलापूर रोड, नगर रोड, गणेशखिंड रोडवर काही वेळ दिसून आली.


संध्याकाळी ६ नंतर पुण्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी यासाठी जय्यत तयारी केली आहे. तब्बल ९६ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असुन प्रत्येक ठिकाणी बाहेर पडणाऱ्या लोकांची तपासणी करुन त्यांना जाण्याची परवानगी पोलिस देत आहेत. अर्थात यावेळी पोलिस सहीष्णु भुमिका स्विकारणार आहेत. कारण नीट दिलं तर बाहेर पडणाऱ्यांची कोणतीही अडवणूक केली जाणार नाही. 


पुणे शहरात सहा नंतर संचारबंदी लागू करण्यात आलेली असली तरी ऑफिसमधून घरी परतणाऱ्या कुणाचीही अडवणूक होणार नाही. मात्र त्यांनी आपल्याबरोबर काम करत असलेल्या संस्थेचे, कंपनीचे ओळखपत्र किंवा पत्र सोबत बाळगावे. तसेच इतर ठिकाणाहून पुण्यात परतलेल्या प्रवाशांना देखील प्रवासाची मुभा असेल. पण विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. 
डॉ. रवींद्र शिसवे, पुणे पोलीस सहआयुक्त. 

Web Title: Pune Night Curfew : Pune citizens beware of falling out of the house for no reason; Inquiries will be held in 96 places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.