Pune news : दररोजच्या ट्रॅफिकला ब्रेक लागणार ? औंध-खडकीसाठी मोठा प्लॅन चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 16:34 IST2026-02-07T16:34:38+5:302026-02-07T16:34:58+5:30
भुयारी मार्गासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवणार : सार्वजनिक बांधकाम विभागाचे आश्वासन

Pune news : दररोजच्या ट्रॅफिकला ब्रेक लागणार ? औंध-खडकीसाठी मोठा प्लॅन चर्चेत
औंध : औंध ते खडकी स्टेशन रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. लोकांच्या कामाचा वेळ प्रवासात वाया जातो. त्यामुळे या रस्त्यावर उड्डाणपूल अथवा भूमिगत रस्ता करावा, अशी मागणी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. राज्य शासनाकडून प्रस्ताव आल्यास केंद्र सरकारच्या सेतूबंधन योजनेतून हा रस्ता करण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिले होते. याबाबत राष्ट्रवादी (शरद पवार)चे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर यांची भेट घेतली. त्यांना प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याबाबत पत्र देऊन विनंती केली. त्यावर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकरच या रस्त्याची पाहणी करून याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकार, तसेच संबंधित यंत्रणांना देण्याचे आश्वासन दिले.
पत्रात म्हटले आहे की, औंध रोड, खडकी स्टेशन रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. हाच रस्ता पुढे खडकी पोलिस ठाण्याजवळून राष्ट्रीय महामार्गाला जोडला जातो. या मार्गावर असलेल्या खडकी पोलिस ठाण्याच्या पाठीमागे रेल्वेचा ब्रिटिशकालीन पूल आहे. या पुलाच्या खालून रस्ता जाऊन तो राष्ट्रीय महामार्गाला जोडतो. औंध, औंध रोड, बोपोडी, चिखलवाडी, सांगवी येथून पुणे शहरात जाण्यासाठी, तसेच खडकी, कोरेगाव पार्क, विमाननगर, येरवडा, नगररस्ता या भागात जाण्यासाठी दररोज हजारो नागरिक या मार्गाचा वापर करतात. मात्र, हा अंडरब्रिज रस्ता अत्यंत अरुंद आहे. त्याचप्रमाणे येथे नेहमी सांडपाणी साठून राहिलेले असते. यामुळे येथे वारंवार वाहतूककोंडी होत असते.
हा रस्ता मुंबई-पुणे महामार्गाशी खडकी पोलिस ठाण्यासमोर जोडला गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल अथवा भूमिगत मार्ग होणे अत्यंत गरजचे आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महामार्गासाठी असलेल्या विशेष तरतुदीतून भुयारी मार्ग अथवा उड्डाणपुलासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे माने यांनी या पत्राद्वारे केली होती. त्यावर त्यांनी राज्य सरकारकडून प्रस्ताव आल्यास केंद्र सरकारच्या सेतूबंधन योजनेमधून येथे उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग करण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे राज्य सरकार मार्फत केंद्राच्या रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाला हा प्रस्ताव जाणे गरजेचे असल्याचे ही माने यांनी या भेटीत बाविस्कर यांना सांगितले. यावर त्यांनी लवकरच याबाबत पाहणी करून प्रस्ताव तयार करण्याचे, तसेच हा प्रस्ताव राज्य शासनासह संबंधित यंत्रणांना पाठवण्याचे आश्वासन दिले.