सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘वी वाँट, कॅरी ऑन’चा नारा;शासनाने मागितली दाेन दिवसांची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 10:42 IST2025-07-15T10:41:23+5:302025-07-15T10:42:15+5:30

विद्यार्थ्यांचे हाेणारे नुकसान रोखण्यासाठी ‘पुन्हा परीक्षा घ्या, तसेच कॅरी ऑन द्या’ अशी मागणी करत विद्यार्थ्यांसह ‘एनएसयूआय’च्या वतीने साेमवारी (दि. १४) तीव्र आंदाेलन करण्यात आले.

pune news We want carry on slogan raised at Savitribai Phule Pune University Government seeks two days time | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘वी वाँट, कॅरी ऑन’चा नारा;शासनाने मागितली दाेन दिवसांची मुदत

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘वी वाँट, कॅरी ऑन’चा नारा;शासनाने मागितली दाेन दिवसांची मुदत

पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठांतर्गत इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना एक-दोन विषयांत नापास झाल्यामुळे ‘इअर डाऊन’चा फटका बसत आहे. त्यांचे संपूर्ण वर्षच वाया जात आहे. यात विद्यार्थ्यांचे हाेणारे नुकसान रोखण्यासाठी ‘पुन्हा परीक्षा घ्या, तसेच कॅरी ऑन द्या’ अशी मागणी करत विद्यार्थ्यांसह ‘एनएसयूआय’च्या वतीने साेमवारी (दि. १४) तीव्र आंदाेलन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळील गेटवर चढून आत प्रवेश करत कुलगुरू कार्यालयासमाेर आंदोलन केले. याप्रसंगी ‘वी वाँट, कॅरी ऑन’च्या घाेषणा देण्यात आल्या.

अभ्यासक्रमाची व्याप्ती आणि परीक्षेतील बदलांमुळे त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. आम्हाला 'कॅरी ऑन'ची सवलत मिळाली नाही, तर आमचे एक वर्ष वाया जाईल. एका विषयांत अनुत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी असून, त्यांचे पूर्ण वर्षच वाया जाणार आहे. अशा विद्यार्थ्यांनी करायचे काय? विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती विद्यापीठाला करत आहाेत, असे आंदाेलक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
 



प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलनकर्ते गेटवर चढले आणि थेट विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर पाेहाेचले. पोलिसांनी हस्तक्षेप करत ‘एनएसयूआय’चे प्रतिनिधी व विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी कुलगुरूंशी थेट भेट घडवून दिली. विद्यापीठाने सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी दाेन दिवसांची मुदत मागितली आहे. वेळेत निर्णय झाला नाही तर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा एनएसयूआय आणि विद्यार्थी काँग्रेसतर्फे देण्यात आला. या वेळी विद्यार्थी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव अक्षय जैन, एनएसयूआयचे प्रवक्ते अविनाश सोळुंके, विद्यार्थी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भूषण रानभरे, आलसी इंजिनिअर चॅनेलचे रोनक खाबे, महेश कांबळे, राज जाधव, तेजस बनसोड, अभिषेक पवार, सचिन भाडख, वैभव महाडिक, अभिषेक जाधव, रोहित निकम, श्रद्धा डोंड, यश जाधव, साहिल चव्हाण आदी उपस्थित होते.

या आहेत विद्यार्थ्यांच्या मागण्या

- निकालातील अनियमितता, चुकीचे ग्रेस मार्क्स, फोटोकॉपी व रिव्हॅल्युएशन प्रक्रियेतील त्रुटी तत्काळ दूर करा. निकालाच्या वेबसाइटवर वारंवार बदल हाेत असून त्यात सातत्य ठेवा.

- अमरावती विद्यापीठाने 'कॅरी ऑन' चा निर्णय घेतला आहे, मग पुणे विद्यापीठ का घेऊ शकत नाही? यावर तत्काळ निर्णय घ्या किंवा पुनर्परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही, याची दक्षता घ्या.

'कॅरी ऑन' म्हणजे काय?

एखादा विद्यार्थी मागील वर्षाच्या काही विषयांमध्ये नापास झाला असले तर, त्याला पुढील वर्षात प्रवेश देऊन त्या विषयांची परीक्षा नंतर देण्याची सवलत देणे म्हणजे ‘कॅरी ऑन’चा निर्णय हाेय. ही सवलत विद्यार्थ्यांना कोरोनाकाळात दिली जात होती, मात्र आता ती बंद केली आहे. यामुळे विद्यार्थी एका वर्षात अनुत्तीर्ण झाला तरी त्याला पुढील वर्षात प्रवेश मिळणार नाही आणि यात त्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार आहे.

आंदाेलक विद्यार्थी म्हणतात...

- आम्ही पेपर लिहून देखील अपेक्षित मार्क मिळत नाहीत. आता आंदाेलन केले तर दोन दिवस थांबा म्हणत आहेत. आमचे पूर्ण वर्ष वाया जाईल.
- एका विषयात नापास झालाे म्हणून पूर्ण वर्ष वाया घालणे याेग्य नाही. तेव्हा त्या विषयाची फेरपरीक्षा घ्या आणि पूर्ण वर्ष वाया जाण्यापासून वाचवा.

- आठ दिवसांपूर्वीच शांततेच्या मार्गाने आम्ही विद्यापीठात आंदाेलन केले होते. तेव्हाही विद्यापीठाने आम्हाला दोन दिवसांची वेळ मागितली हाेती, सहा दिवस झाले तरी कोणताच निर्णय न झाल्याने आम्हाला पुन्हा आंदोलन करावे लागले.
- विद्यापीठाने ‘कॅरी ऑन’चा निर्णय मान्य केला नाही तर आमचे शिक्षण अर्धवट अर्धवट राहील.

- मी आता तृतीय वर्षात आहे. दुसरे वर्ष उत्तीर्ण झाले असून, माझा प्रथम वर्षाचा एक विषय राहिला आहे. त्यामुळे माझं पूर्ण वर्ष वाया जाऊ शकतं. ‘कॅरी ऑन’चा निर्णय झाला तर एक संधी भेटेल.

विद्यार्थ्यांना वारंवार रस्त्यावर उतरावं लागतंय, आंदोलनं करावी लागत आहेत. हे त्यांचं काम नाही. पण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ म्हणून ओळखलं जाणारं विद्यापीठ आपल्याच विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालत असेल, तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. - अक्षय जैन, माजी राष्ट्रीय सचिव, विद्यार्थी काँग्रेस   

 

विद्यार्थ्यांचे वर्ष वाचवण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ. विद्यापीठ प्रशासनाने वेळेवर निर्णय घेतला नाही, तर हे आंदोलन महाराष्ट्रभर पेटेल.  - भूषण रानभरे, माजी जिल्हाध्यक्ष, विद्यार्थी काँग्रेस
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी कॅरी ऑन किंवा पुरवणी परीक्षेसंदर्भात निवेदने सादर केली आहेत. अशी मागणी केलेले सर्व विद्यार्थी त्या-त्या वर्षात किमान ५० टक्के श्रेयांक प्राप्त करू शकले नाहीत. तरीही विद्यार्थी हिताच्या दृष्टीने विचार करून कायदेशीर बाबी पाहून, संबंधित शिखर संस्थांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. - प्रा. डॉ. प्रभाकर देसाई, प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ  

विद्यापीठ प्रशासन नेहमीच विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून निर्णय घेत असते. याही अगोदर विशिष्ट परिस्थितीत विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही, असे निर्णय घेतले आहेत. तेव्हा कायदेशीर सल्ला घेऊन आणि नियमांच्या अधीन राहून सकारात्मक निर्णय घेतला जाईल.
- प्रा. डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू

Web Title: pune news We want carry on slogan raised at Savitribai Phule Pune University Government seeks two days time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.