भिडे पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले का ? अजित पवारांच्या प्रश्नाने अधिकारी गोंधळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 09:56 IST2025-10-16T09:55:06+5:302025-10-16T09:56:24+5:30
अजित पवारांच्या प्रश्नावर कोणतेही उत्तर न देता अधिकारी एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले, त्यामुळे पवार यांनी अधिकचे प्रश्न विचारणे टाळले.

भिडे पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले का ? अजित पवारांच्या प्रश्नाने अधिकारी गोंधळले
पुणे : मुठा नदीवरील बाबा भिडे पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे का, असा प्रश्न उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी अचानक विचारल्याने मेट्रोच्या अधिकाऱ्यांसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांची चांगलीच पंचायत झाल्याचे पहायला मिळावे. अजित पवारांच्या प्रश्नावर कोणतेही उत्तर न देता अधिकारी एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले, त्यामुळे पवार यांनी अधिकचे प्रश्न विचारणे टाळले.
अजित पवार यांनी मेट्रो, महापालिका आणि पोलिस अधिकाऱ्यांसमवेत बुधवारी (दि. १५) सकाळी ७ वाजता मेट्रो प्रशासनाकडून मुठा नदीवर उभारण्यात आलेल्या तानपुरा ब्रिजची पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांकडून त्यांना बाबा भिडे पुलावर मेट्रोकडून उभारण्यात येत असलेल्या पादचारी पुलाची माहिती देण्यात येत होती. अधिकारी नियोजित पुलाचे तैलचित्र व ड्रॉइंग दाखवत असताना अचानक पवार यांनी बाबा भिडे पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे का, असा प्रश्न केला. या प्रश्नावर अधिकारी एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. यावेळी उपस्थित असणारे महापालिकेच्या सहायक आयुक्तांनाही याबद्दल काही माहिती नव्हते.
अधिकारी अधिकाऱ्यांची चलबिचल पाहून अजित पवार यांनीही या विषयावर अधिकचे प्रश्न टाळून पादचारी पुलाचे काम कधी पूर्ण होणार आहे? अशी विचारणा केली. त्यावर अधिकाऱ्यांनी हे काम तीन महिन्यात पूर्ण होईल, असे सांगितले. त्यावर अजित पवार म्हणाले, या पुलाचे काम झाल्यानंतर भिडे पूल आपण काढून टाकू. त्यावर उपस्थित असलेले पोलिस अधिकारी मनोज पाटील यांनी भिडे पूल हा डेक्कन व शनिवार पेठ परिसरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. हा पूल पावसाळ्यात नदीला पाणी आल्यावर व आता पादचारी पुलाच्या कामासाठी बंद ठेवला जातो.
पूल बंद केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज पूल (लकडी पूल) व डेक्कन परिसरातील मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे भिडे पूल वाहतुकीसाठी फायद्याचा असल्याचे सांगितले. दरम्यान, अजित पवार यांनी तानपुरा ब्रीजची पाहणी करताना, कामातील अनेक त्रुटी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत, त्या तातडीने दूर करण्यासोबतच दिवाळी झाल्याबरोबर नदी पात्रातील फटाका स्टॉल व त्याचे साहित्य हटवून रस्ता मोकळा करण्याचा सूचना केल्या.
दादा तेवढं बालोद्यान आणि ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवा
अजित पवार सकाळी ७ वाजताच ब्रिजची पाहणी करण्यासाठी आल्याने जागोजागी त्यांना सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांनी प्रश्न सोडवण्याची विनंती केली. परिसरामध्ये लहान मुलांसाठी उद्यान नाही किंवा लहान मुलांसाठी दर्जेदार खेळाचे साहित्य नाही. त्यामुळे बालोद्यानाचा प्रश्न मार्गी लावा तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्या आहे, या समस्या सोडवण्याची विनंती केली.
भिडे पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले
महापालिकेच्या प्रकल्प विभागाने शहरातील ९८ लहान-मोठ्या पुलांची पाहणी करून पाच वर्षात बांधलेले व पाच वर्षात ऑडिट करून दुरुस्त केलेले पूल सोडून ६८ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. यामध्ये बाबा भिडे पुलाचेही स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे. पुलाची किरकोळ दुरुस्ती असून, ती लवकरच केली जाणार आहे. - दिनकर गोजार, मुख्य अभियंता प्रकल्प विभाग, महापालिका