३० ते ४० जणांनी मिळून मारहाण केली,आम्ही असा काय गुन्हा केला होता; घाडगेंनी अजित पवारांना विचारला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 18:51 IST2025-07-25T18:48:17+5:302025-07-25T18:51:52+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झालेले छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांनी शुक्रवारी (दि. २५) सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

pune news Vijaykumar Ghadge of the Chhawa organization met Deputy Chief Minister Ajit Pawar on Friday (25) morning | ३० ते ४० जणांनी मिळून मारहाण केली,आम्ही असा काय गुन्हा केला होता; घाडगेंनी अजित पवारांना विचारला प्रश्न

३० ते ४० जणांनी मिळून मारहाण केली,आम्ही असा काय गुन्हा केला होता; घाडगेंनी अजित पवारांना विचारला प्रश्न

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झालेले छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांनी शुक्रवारी (दि. २५) सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. असंवेदनशील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्या, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी पवार यांना दिला. त्यावर पवार यांनी घाडगे यांना मंगळवारपर्यंत (दि.२९) थांबण्यास सांगितले ते घाडगे यांनी मान्य केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी छावा संघटनेचे कार्यकर्ते गेले असता तिथे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली. त्यानंतर अजित पवार यांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत मारहाण प्रकरणावरून पक्षाच्या युवा आघाडीचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेतला. चव्हाण नंतर पोलिसांसमोर हजरही झाले. ज्यांना मारहाण झाली ते विजयकुमार घाडगे अजित पवार यांची भेट घेण्यासाठी शुक्रवारी पुण्यात आले होते. मात्र, ते थेट सरकारी विश्रामगृहात गेले. तिथून त्यांनी घाडगे यांना भेट घेण्यासाठी ५ जणांच्या शिष्टमंडळासह विश्रामगृहावर या असा निरोप पाठवला.

ही भेट ऑन कॅमेरा व्हावी, अशी मागणी घाडगे यांनी केली. त्याला पवार यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे भेट न घेताच ते लातूरला परत निघाले होते. मात्र, पुन्हा त्यांना पोलिसांकडून सरकारी कॅमेरे असतील, तुम्ही या असा निरोप मिळाला. त्यानंतर पवार व घाडगे यांची भेट झाली. भेटीनंतर पत्रकारांबरोबर बोलताना घाडगे यांनी सांगितले की, आम्ही त्यांच्याकडे कृषिमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी गेली. इतक्या असंवेदनशील मंत्र्याला तुम्ही मंत्रिमंडळात ठेवलेच कसे? असा प्रश्न केला. ३० ते ४० जणांनी मिळून मारहाण केली, आम्ही असा काय गुन्हा केला होता, असेही त्यांना विचारले. राजीनामा झाला नाही, तर राज्यव्यापी आंदोलन करणार असे सांगितले. त्यावर पवार यांनी मंगळवारपर्यंत थांबा, यासंदर्भात नक्की काहीतरी निर्णय होईल, असे सांगितले.

Web Title: pune news Vijaykumar Ghadge of the Chhawa organization met Deputy Chief Minister Ajit Pawar on Friday (25) morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.