Video : 'हा' कसला मुळशी पॅटर्न..! कुस्तीच्या आखाड्यातच सिकंदर शेखवर हल्ल्याचा प्रयत्न
By किरण शिंदे | Updated: February 19, 2026 16:37 IST2026-02-19T16:35:43+5:302026-02-19T16:37:47+5:30
सिकंदर शेखवर आखाड्यातच हात उचलला; मुळशीच्या कुस्ती स्पर्धेतील व्हिडिओ व्हायरल

Video : 'हा' कसला मुळशी पॅटर्न..! कुस्तीच्या आखाड्यातच सिकंदर शेखवर हल्ल्याचा प्रयत्न
पुणे -पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पौड गावात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित निकाली कुस्ती स्पर्धेत धक्कादायक प्रकार घडला. मैदानात सुरू असलेल्या कुस्तीदरम्यान एकाने आखाड्यात घुसून पैलवान सिकंदर शेखवर हात उचलल्याने एकच खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
महाशिवरात्रीनिमित्त पौड येथे माऊली कोकाटे आणि सिकंदर शेख यांच्यात अकरा लाख रुपयांच्या निकाली कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्तीला पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच रोहिदास आप्पा हे देखील उपस्थित होते.
दोन्ही पैलवान जवळपास तासभर झुंज देत होते. निकाल लागत नसल्याने आयोजकांनी स्पीकरवरून निकाल लागेपर्यंत कुस्ती थांबवली जाणार नाही अशी घोषणा केली आणि त्यानंतर माऊली कोकाटे आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्याने सिकंदरच्या मानेवर वारंवार फटके मारल्याचे मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले. मात्र बराच वेळ संयम राखलेल्या सिकंदर शेख याचा संयम सुटला आणि त्याने दिसले जोरदार प्रतिकार सुरू केला. दोन्ही पैलवानांमध्ये जोरदार झुंज सुरू असतानाच वातावरण तापले.
याच दरम्यान अचानक माऊली कोकाटेचा एक समर्थक थेट आखाड्यात घुसला आणि त्याने सिकंदर शेखवर हात उचलला. त्यानंतर काही क्षणातच आणखी काही समर्थक मैदानात घुसले आणि सिकंदर शेखच्या अंगावर धावून जाताना दिसले. परिस्थिती चिघळेल अशी स्थिती असतानाच आयोजक आणि पंचांनी हस्तक्षेप करत दोन्ही पैलवानांना वेगळे केले. मैदानात घुसलेल्या प्रेक्षकांना बाहेर काढले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान आखाड्यात घडलेली ही सर्व घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मैदानात घुसून सिकंदर शेखवर हात उचलणारा तरुण नेमका कोण? याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र कुस्तीप्रेमींकडून संबंधित तरुणावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.