Video : निवडणूक आयोगाचे काम मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर चालते; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 20:39 IST2025-12-02T20:26:59+5:302025-12-02T20:39:23+5:30
- राज्यातील पंचायत समिती, नगरपरिषदांच्यामतदानाला ४० तास शिल्लक असताना मतदान आणि मतमोजणी पुढे ढकलण्यात आल्याने निवडणूक आयोगाच्या कारभाराचे वाभाडे निघाले आहेत.

Video : निवडणूक आयोगाचे काम मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर चालते; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
पुणे - राज्यातील पंचायत समिती, नगरपरिषदांच्यामतदानाला ४० तास शिल्लक असताना मतदान आणि मतमोजणी पुढे ढकलण्यात आल्याने निवडणूक आयोगाच्या कारभाराचे वाभाडे निघाले आहेत. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात प्रशासकीय गोंधळ, मतांची धांदल दिसून येत असून निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षांच्या हातातील बाहुले झाले आहे. निवडणूक आयोग मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे, असा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
सकपाळ एका कार्यक्रमासाठी मंगळवारी पुण्यात आले होते. कार्यक्रमापूर्वी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी भाजप व सत्ताधाऱ््यांवर निषाणा साधला. ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये झालेला गोंधळ पाहता निवडणूक आयोग नशापाणी करुन काम करत आहे की काय? असा प्रश्न पडत आहे. राज्यात सत्ताधारी म्हणून काम करताना भाजप पैसा खाऊन गब्बर झाली आहे.
सगळ्यांवर दडपण आणण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. ‘पैसा फेक तमाशा देख’ या वृत्तीने भाजप काम करत आहे. निवडणुकीत झालेल्या गोंधळाच्या राज्याच्या विविध भागातून २५ हजारापेक्षा अधिक तक्रारी आल्या असाव्यात. आजच्या निवडणुकीने लोकशाहीला मोठा फटका बसला असून लोकशाहीची पायमल्ली झाल्याचे सपकाळ यांनी सांगितले. सत्ताधार्यांना रावणापेक्षा देखील जास्त अहंकार आलेला आहे. लोकशाही ज्या दिशेने चालली आहे. ते घातक असून आता विजयी झालेले उमेदवार फोडले जातील, अशी भितीही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी व्यक्त केली. काँग्रेस राज्यभरात १६० ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी लढत आहे. पक्षाचे नेते राज्यात सर्वत्र फिरले. एकट्यानेच राज्यभरात ६५ सभा घेतल्याचे सपकाळ म्हणाले.
काँग्रेस मुक्त नव्हे तर काँग्रेस युक्त भाजप
भाजपने काँग्रेस पक्ष संपविण्यासाठी ‘काँग्रेस मुक्त’ भारत अशी घोषणा केली होती. पण आता भाजपची स्थिती पाहता काँग्रेस युक्त भाजप झाला आहे, असे दिसते. काँग्रेस हा विचार आहे. कोणाच्याही जाण्याने तो संपणार नाही, असेही सकपाळ यांनी सांगितले. सत्तेची मस्ती काय असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमदार संतोष बांगर आहे. जेवढे त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात. तेवढी पदके मिळाल्याच्या तोऱ्यात ते वागतात, असेही सपकाळ म्हणाले.