Video : बिबट्याची दहशत..! नगर-कल्याण महामार्गावर बिबट्याची मोटरसायकलला धडक; शेतकरी गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 19:42 IST2025-11-12T19:38:20+5:302025-11-12T19:42:05+5:30
- मोटरसायकलवरून खताची गोणी घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यावर अचानक बिबट्याने झडप घातल्याने एकच खळबळ उडाली.

Video : बिबट्याची दहशत..! नगर-कल्याण महामार्गावर बिबट्याची मोटरसायकलला धडक; शेतकरी गंभीर जखमी
ओतूर : नगर-कल्याण महामार्गावर अहीनवेवाडी फाटा येथील माऊली कृषी केंद्राजवळ आज सायंकाळी सुमारास सहा वाजेच्या दरम्यान धक्कादायक घटना घडली. मोटरसायकलवरून खताची गोणी घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यावर अचानक बिबट्याने झडप घातल्याने एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, निलेश सीताराम डोके (रा. आंबेगव्हाण, ता. जुन्नर) हे मोटरसायकलवरून घरी जात असताना रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तात्काळ आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून धडक दिल्यानंतर बिबट्या तिथून पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
नगर-कल्याण महामार्गावर बिबट्याची मोटरसायकलला धडक – शेतकरी गंभीर जखमी pic.twitter.com/HzBqH1OH2v
— Lokmat (@lokmat) November 12, 2025
या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून ओतूर-जुन्नर परिसरात बिबट्यांचे प्रमाण वाढले असून, वनविभागाने तात्काळ घटनास्थळी जाऊन पिंजरा लावावा, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. ही घटना पुन्हा एकदा ग्रामीण भागातील बिबट्यांच्या वाढत्या वावराचे आणि सुरक्षेच्या अभावाचे अधोरेखित करणारी ठरली आहे.