Video : माळशेज घाटात मुसळधार पावसामुळे काळू नदीला पूर; ५० पर्यटकांची थरारक सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 14:51 IST2025-07-27T14:49:55+5:302025-07-27T14:51:12+5:30
पर्यटनासाठी धबधब्याच्या परिसरात गेलेले पर्यटक अचानक आलेल्या पुरामुळे अडकल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासनाने तत्काळ मदतीस धाव घेतली.

Video : माळशेज घाटात मुसळधार पावसामुळे काळू नदीला पूर; ५० पर्यटकांची थरारक सुटका
पुणे - मागील काही दिवसांपासून माळशेज घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पर्यटकांच्या आवडीच्या काळू नदीला मोठा पूर आला आहे. या पूरपरस्थितीत शनिवारी सायंकाळी काळू धबधबा परिसरात अडकलेल्या सुमारे ४० ते ५० पर्यटकांची थरारक सुटका करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ चर्चेत आला आहे.
अधिकच्या माहीतीनुसार, पर्यटनासाठी धबधब्याच्या परिसरात गेलेले पर्यटक अचानक आलेल्या पुरामुळे अडकल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासनाने तत्काळ मदतीस धाव घेतली. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे अडलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, बचाव पथकाच्या सतर्कतेने आणि संयमाने एकामागोमाग एक सर्व पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
ही संपूर्ण बचावमोहीम अत्यंत कठीण परिस्थितीत पार पडली. धबधब्याच्या परिसरात चिखल, निसरडी जमीन आणि सतत कोसळणारा पाऊस यामुळे अडथळे निर्माण होत होते. तरीदेखील पोलिस, स्थानिक नागरिक आणि आपत्कालीन यंत्रणेने मोठ्या धैर्याने सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका केली.
या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, पावसाळ्यात धबधब्यांच्या ठिकाणी जाताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. माळशेज घाट परिसरातील निसर्गरम्य ठिकाणे जितकी आकर्षक आहेत, तितकीच पावसाळ्यात धोकादायकही ठरू शकतात, हे पुन्हा एकदा या घटनेतून स्पष्ट झाले आहे.