“काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं” शरद पवारांसोबत भेटीनंतर आज बारामतीत अजित पवार म्हणाले…
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 16:56 IST2025-04-13T16:56:22+5:302025-04-13T16:56:51+5:30
पीआयला सांगितला आहे. काकालाही म्हणलं विश्वासात घ्या, कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं

“काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं” शरद पवारांसोबत भेटीनंतर आज बारामतीत अजित पवार म्हणाले…
सुपे : मी त्या एका रस्त्याबद्दल सांगितलं आहे. त्याबद्दल सहकार्य करा. मी बीडीओला सांगितलं आहे, तहसीलदाराला सांगितला आहे, पीआयला सांगितला आहे. काकालाही म्हणलं विश्वासात घ्या, कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं. त्याशिवाय पुढे काहीच चालत नाही.
अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. नाहीतर काका कुतवळ, नाहीतर लगेच तुम्ही म्हणाल दादा घसरले, दादा कोणावर घसरले नाहीत, असंही अजित पवार मिश्किलपणे म्हणाले. बारामती तालुक्यातील सुपे परिसरातील बोरकरवाडी तलावात पाईपलाईनद्वारे जनाई उपसा जलसिंचन योजनेचे पाणी सोडण्यात आले. बोरकरवाडी तलावात आलेल्या पाण्याचे पुजन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
बोरकरवाडी येथील सुमारे १३०० मिटर पाईपलाईन टीसीएस फौडेशनच्या सीएसआर निधीतून सुमारे २ कोटी ९० लाख खर्चाचे काम करण्यात आले आहे. जनाई उपसा जलसिंचन योजनेच्या उजवा कालवा ते बोरकरवाडी तलावापर्यत पाईपलाईनचे काम करण्यात आले आहे. मात्र त्यातील राहिलेले २०० मिटरचे काम निधी मिळताच लवकरच पुर्ण करण्यात येईल असे पवार यांनी सांगितले. यावेळी लाडक्या बहिणीकडे लक्ष दिले. त्यावेळी आमच्यावर टीका झाली. निवडणूक झाली योजना बंद करतील. पण, तसे आम्ही केलं नाही. योजना सुरू ठेवली. मी जोपर्यंत लोकप्रतिनिधी आहे तोपर्यंत मी अडचण येऊ देणार नाही.
पुरंदर विमानतळ काम हातात घेतले आहे. लोकं विरोध करत आहेत, पण विमानतळ केल्याशिवाय पर्याय नाही. आम्ही सरकार म्हणून बसलो आहे. मी गरीबावर अन्याय होऊ देणार नाही. कामे हवेत होणार नाही. त्यासाठी जागा लागेल. जातीय सलोखा असला पाहिजे. कुठे कायतरी झालं म्हणून मारहाण करायची हे चालणार नाही. आपण भारतीय आहोत. आपण शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचाराने राहिले पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.
जे बोललो ते शंभर दिवसांत करुन दाखवलं -
विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी बोरकरवाडीच्या ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार जानाई उपसा सिंचन योजनेतील पाणी पाईपलाईनद्वारे बोरकरवाडीच्या तलावात आणून सोडण्याचे पवार यांनी आश्वासन दिले होते. त्यानुसार निवडणुकित जे बोललो ते शंभर दिवसात करुन दाखवलं असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहिर सभेत सांगितले. तसेच सुप्यातील प्रारुप विकास आराखड्यामध्ये काहीच्या जागा जात आहेत. त्या गरिबांना मी वाऱ्यावर सोडणार नाही. कारण विकास कामे करताना अडचणीं येतातच मात्र त्यातुन मार्ग काढावा लागतो असे पवार यांनी सांगितले.