उजनीच्या मूळ सिंचन आराखड्याला छेद; नदीपात्रात विसर्ग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 11:55 IST2025-03-26T11:55:41+5:302025-03-26T11:55:54+5:30

तरतूद नसतानाही राजकीय दबावापोटी उन्हाळ्यात सोडले जाते पाणी

pune news Ujani original irrigation plan has been disrupted; discharge into the riverbed has begun | उजनीच्या मूळ सिंचन आराखड्याला छेद; नदीपात्रात विसर्ग सुरू

उजनीच्या मूळ सिंचन आराखड्याला छेद; नदीपात्रात विसर्ग सुरू

पळसदेव : उजनी धरणात उन्हाळ्यात नदीपात्रात पाणी सोडण्याची तरतूद नसताना देखील दरवर्षी राजकीय दबावापोटी उजनी धरणातून बेकायदेशीररीत्या नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे मात्र धरणग्रस्त शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. यावर्षी देखील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सुमारे ११ टीएमसी पाणी बेकायदेशीररीत्या सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जो धरणग्रस्तांना रस्त्यावर आणणारा आल्यात मत उजनी धरणग्रस्त इंदापूर तालुका बचाव कृती समितीचे अध्यक्ष अरविंद जगताप यांनी व्यक्त केले.

कालवा सल्लागार समितीच्या झालेल्या निर्णयानुसार भीमा नदीतून पहिलं आवर्तन ६ एप्रिल ते २० एप्रिल यादरम्यान ६.५० टीएमसी व २६ मे ते ७ जूनपर्यंत ४.५० टीएमसी पाणी सोडण्याचा बेकायदेशीर निर्णय झाला आहे. मूळ सीनचा आराखड्यात उन्हाळ्यात नदीपात्रात पाणी सोडण्याची तरतूद नसताना हा प्रताप करण्यात आला आहे. उलट धरणग्रस्तांच्या हक्काच्या राखीव पाण्याची तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे सरकारने पुन्हा यावर्षी धरणग्रस्त शेकऱ्यांवर अन्याय केला असल्याचा आरोप अरविंद जगतापसह धरणग्रस्त शेतकरी करीत आहेत.

६ जानेवारी २०१६ ला लवादाने सोलापूरला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन तातडीने पूर्ण करण्याचा आदेश दिला होता. याला आता ९ वर्षांचा कालावधी लोटला तरी देखील अद्याप पाइपलाइन पूर्ण करण्यात आली नाही व बेकायदेशरीररीत्या पिण्याच्या नावाखाली नदीपात्रातून सिंचनासाठी उजनीतून पाणी नेलं जात आहे. उजनीतून बेकायदेररीत्या पाणी नेण्यासाठी जाणीवपूर्वक या पाइपलाइनचे काम रेंगाळत ठेवले जात असल्याचा आरोप इंदापूर तालुक्यातील धरणग्रस्त शेतकरी करत आहेत.
सध्या उजनी धरणात केवळ १८.६४ टीएमसी पाणी शिल्लक आहे आणि दररोज सुमारे ४२०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बोगदा ३३३, कॅनॉल २८५० क्युसेक, दहिगाव योजना १२० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याचप्रमाणे विसर्ग सुरू राहिल्यास ७ जूनपर्यंत सोडण्यासाठी धरणात पाणीच शिल्लक राहणार नाही.

५० गावांतील नागरिकांना फटका

विशेष बाब म्हणजे इंदापूरचे आमदार व विद्यमान क्रीडा मंत्री यांच्या काळात लवादाचा हा निर्णय झाला होता. त्यानंतर भरणे यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद असतानाच्या काळात देखील इंदापूरच्या आमदारांची तालुक्यातील जनतेचा उजनीच्या राखीव पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पाइपलाइन पूर्ण कारण्यासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत, असा आरोप अरविंद जगताप यांनी केला. त्यामुळे सध्या इंदापूर तालुक्यातील धरणग्रस्त २७ गाव व उजनीच्या पाण्यावर अवलंबून असणारी २० ते २५ अशी सुमारे ४० ते ५० गावांतील नागरिकांना याचा फटका बसला आहे.

पाण्यासाठी शेतकऱ्यांना जीवाचं रान करून उजनीतील गाळात पाइप व केबल वाढवण्याची वेळ आली आहे. धरणग्रस्त शेतकरी मामा आम्हाला विकास नको, आमच्या शेतीला पाणी द्या, अशी विनवणी करत आहे. तरी उजनीच्या हक्काच्या पाण्याबाबत काठावरील शेतकरी संघटित नसल्याने राज्यकर्ते केवळ पाण्यावर राजकारण करून वेळ मारून नेत आहेत व दरवर्षी शेतकऱ्याला मात्र हक्काच्या जमिनी देऊन पाण्यासाठी रडत बसण्याची वेळ आली आहे.

Web Title: pune news Ujani original irrigation plan has been disrupted; discharge into the riverbed has begun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.