माळशेज घाटात दोन वेगवेगळे बस अपघात; आठ जखमी; मोठी जीवितहानी टळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 16:33 IST2025-10-26T16:32:22+5:302025-10-26T16:33:10+5:30
पहिला अपघात दुपारी सुमारास १२ वाजता एम.एच २० व्ही.एल ३०४७ या अहिल्यानगर–कल्याण एस.टी. बसचा झाला.

माळशेज घाटात दोन वेगवेगळे बस अपघात; आठ जखमी; मोठी जीवितहानी टळली
ओतूर: माळशेज घाटात रविवार (दि. २६ ऑक्टोबर) दुपारी १२ ते साडेबारा या वेळेत दोन स्वतंत्र बस अपघात झाले. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातांमध्ये आठ प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
पहिला अपघात दुपारी सुमारास १२ वाजता एम.एच २० व्ही.एल ३०४७ या अहिल्यानगर–कल्याण एस.टी. बसचा झाला. माळशेज घाटातील छत्री कॉर्नरजवळ वळणावर बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली. या अपघातात आठ प्रवासी जखमी झाले असून, स्थानिक नागरिक व प्रवाशांच्या मदतीने त्यांना तत्काळ आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, सुमारे १५ मिनिटांनी त्याच घाटात थोडे पुढे आणखी एक अपघात झाला. दिपावलीनिमित्त असलेली ज्यादा बस आळेफाटा- कल्याण एम.एच २० व्ही.एल ३१२४ या बसमध्ये सुमारे ७० प्रवासी प्रवास करत होते. अचानक चालकाचे नियंत्रण सुटून बस घसरली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन धडकली. या बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असून काहींना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.
माळशेज घाटात सध्या दाट धुके आणि घसरडे रस्ते असल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने घाटातून प्रवास करताना काळजी घेण्याचे आणि वेगमर्यादा काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती; मात्र पोलिसांच्या तत्परतेने ती सुरळीत करण्यात आली. या दुहेरी अपघातामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, परंतु सर्व प्रवासी सुखरूप असल्याने उपस्थितांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.