Cyber Crime : मनी लॉण्ड्रिंगच्या धाकाने दोघांना सव्वा कोटीचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 19:45 IST2025-09-27T19:44:15+5:302025-09-27T19:45:08+5:30
- फसवणूक झालेल्यांमध्ये महिला आणि पुरुषाचा समावेश आहे. याप्रकरणी, सायबर आणि स्वारगेट पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले

Cyber Crime : मनी लॉण्ड्रिंगच्या धाकाने दोघांना सव्वा कोटीचा गंडा
पुणे : मनी लॉण्ड्रिंगच्या धाकाने अटक करण्याची भीती दाखवत सायबर ठगांनी दोन ज्येष्ठांना १ कोटी ३१ लाख ५० हजारांचा आर्थिक गंडा घातला आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये महिला आणि पुरुषाचा समावेश आहे. याप्रकरणी, सायबर आणि स्वारगेट पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कर्वेनगर येथील ६७ वर्षीय ज्येष्ठ महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार सायबर ठगांनी त्यांची ९७ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादींनी एक सिम कार्ड खरेदी केले होते. सायबर चोरट्याने त्यांना फोन करून त्यावर तक्रार असल्याचे सांगून भीती घातली. यानंतर मनी लॉण्ड्रिंगच्या केसखाली अटक करतो असे फिर्यादींना धमकावले. फिर्यादींनादेखील असा काही प्रकार झाल्याबाबत खरे वाटले.
पुढे सायबर ठगाने फिर्यादींना यामध्ये मदत करतो असे सांगून वेळोवेळी त्यांच्याकडून ऑनलाइन माध्यमातून ९७ लाख ५० हजार रुपये घेतले. दरम्यान, फिर्यादींना चौकशीअंती असा काही प्रकार नसल्याची माहिती मिळाली. मात्र तोपर्यंत त्यांनी सायबर चोरट्याकडे पैसे हवाली केले होते. याबाबत फिर्यादींनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या घटनेत, शुक्रवार पेठेतील एका ६८ वर्षीय ज्येष्ठाला अशाच प्रकारे सायबर चोरट्यांनी ३४ लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी, ज्येष्ठाने दिलेल्या फिर्यादीनुसार स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. १० ते ११ सप्टेंबरच्या कालावधीत हा प्रकार घडला आहे. सायबर चोरट्याने फिर्यादींना संपर्क साधून वरिष्ठ पोलिस अधिकारी बोलत असल्याची बतावणी करत मनी लॉण्ड्रिंगच्या केसची भीती दाखवली. यानंतर फिर्यादींना डिजिटल अरेस्ट करून मनी लॉण्ड्रिंग प्रकरणातील पैसे पडताळणीच्या नावाखाली विविध बँक खात्यांवर पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.