दिल्लीतील जादुगारामुळे दाेन पिढयांचे नुकसान; पंतप्रधान मोदींवर असुद्दीन ओवेसींची टिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 19:48 IST2025-09-30T19:48:09+5:302025-09-30T19:48:36+5:30
- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर लढणार

दिल्लीतील जादुगारामुळे दाेन पिढयांचे नुकसान; पंतप्रधान मोदींवर असुद्दीन ओवेसींची टिका
पुणे : दिल्लीत बसून एक जादुगार जादूचे प्रयोग करत आहे. आता सर्वांना त्यात आनंद वाटत असला, तरी यात दोन पिढ्यांचे नुकसान झाले आहे. देशातील २५ टक्के तरुणांना योग्य शिक्षण आणि रोजगारापासून वंचित राहावे लागत आहे. भारताची ६५ टक्के लोकसंख्या ४० वर्षांखालची आहे लोकसंख्येच्या लाभांशाचे वरदान संपेल आणि या पिढ्या म्हाताऱ्या होतील, तेव्हा यामुळे काय नुकसान झाले हे समजेल, अशी टीका एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांवर प्रचंड मोठे संकट ओढवले आहे. या परिस्थिती पंतप्रधान राज्यातील पूरग्रस्तांसाठी निधी का देत नाही ? असा सवाल ओवेसी यांनी केला.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने एमआयएमचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांच्याशी वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील ,सरचिटणीस मंगेश फल्ले उपस्थित होते. महाराष्टातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहे असे सांगुन ओवीसी म्हणाले, सध्या विद्यार्थी दशेत असलेल्या युवकांना गोरक्षक बनवले जात आहे, एका धर्माविरोधात भडकावले जात आहे. मात्र, आपले खरे शत्रू हे मुस्लिम नसून सध्याचे सत्ताधारी आहेत, हे त्यांच्या लक्षात येत नाही.देशात जिथे जिथे भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे, तिथे मुस्लिम समाजाला मागे ढकलण्याचे काम केले जात आहे. मुस्लिमांना धमक्या देणे, त्यांच्या घरांवर बुलडोझर चालवणे असे प्रकार घडत आहेत. डोक्यात हवा गेल्याने सध्याच्या सत्ताधाऱ्यांना ते लक्षात येत नाही.भारत सक्षम होण्यासाठी, विश्वगुरू होण्यासाठी सर्व समाज एका पातळीवर यायला हवा. मुस्लिम समाजाला एका बाजूला सारून भारत विश्वगुरू होणार नाही,असे ओवेसी यांनी सांगितले.
पाकव्याप्त काश्मीर परत घेतले पाहिजे
पहलगामचा हल्ला कसा झाला, आपल्या निष्पाप नागरिकांवर हल्ला करण्यासाठी एवढी सुरक्षाव्यवस्था असताना दहशतवादी आत आलेच कसे ? हा प्रश्न कोणी विचारत नाही, आणि उत्तरही कोणी देत नाही.पहलगाम हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये आपल्याला पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवण्याची संधी होती. गुजरात ते काश्मीर सर्व सीमांवर पाकचे ड्रोन होते. पाकला अद्दल घडवावी, अशी संपूर्ण देशाची भावना होती. मात्र, आपण अचानक शस्त्रसंधी का केली असा सवाल ओवेसी यांनी केला. अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही आणि आपण ती घालवली. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे, संसदेनेही तसा ठराव केला आहे. जे आपले आहे, ते आपण घेतलेच पाहिजे, ते स्वत:हून आपल्याकडे येईल, याची वाट पाहू नका असेही एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले.
मुस्लिमांची संख्या हिंदूंपेक्षा कधीच जास्त होणार नाही
मुस्लिमांची संख्या हिंदूंपेक्षा कधीच जास्त होणार नाही. एका अहवालानुसार मुस्लिमांची लोकसंख्या ही स्थिर झाली आहे तर हिंदूंची लोकसंख्या ही २०७१ पर्यंत स्थिर होईल. मुस्लिमांचा जन्मदर कमी झाला आहे. केंद्र सरकार मुस्लिम मुलामुलींचे शाळांमधील ड्रॉपआऊट कमी करण्यासाठी कोणतेच प्रयत्न करत नाही. उलट मुस्लिमांना राजकीय फायद्यासाठी जाणीव पूर्वक लक्ष्य करून त्यांना आणखी मागे ढकलण्याचे काम सरकार करत आहे, असे ओवीसी यांनी सांगितले.
राष्ट्रीय सुरक्षेबाबत ठोस धोरण नाही
पाकिस्तानची लष्करधार्जिणी व्यवस्था भारतासाठी सतत धोका निर्माण करणारी आहे. भारताचे शेजारी नेपाळ, श्रीलंका, बांगलादेशात सरकार विरोधी आंदोलने झाली तेथील सत्ता उलथवण्यात आली. मात्रा याची कल्पना देखील सरकारला नव्हती. ही सर्व देश चीनकडे झुकत आहेत, तरी केंद्र सरकार योग्य धोरण आखत नाही, राष्ट्रीय सुरक्षेबाबत ठोस धोरण नाही अशी टिका ओवेसी यांनी केली.