विजयस्तंभ सोहळ्याआधीच वाहतूक नियोजन कोलमडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 16:06 IST2025-12-31T16:05:45+5:302025-12-31T16:06:16+5:30
- पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण कोंडी : रुग्णवाहिकांनाही बसला फटका

विजयस्तंभ सोहळ्याआधीच वाहतूक नियोजन कोलमडले
कोरेगाव भीमा : ऐतिहासिक कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यास अवघे दोन दिवस उरले असतानाच पुणे-अहिल्यानगर महामार्गावर वाहतूक नियोजनाचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र बुधवारी दिसून आले. लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन सर्वसामान्य नागरिकांसह रुग्णवाहिकांनाही याचा फटका बसला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पेरणे येथील ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या अनुयायींच्या पार्श्वभूमीवर स्तंभ परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात असतानाही महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. या कोंडीत केवळ सामान्य वाहनेच नव्हे, तर पोलिसांच्या गाड्या आणि वाहतूक नियोजन करणारे अधिकारीही अडकून पडल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
लोणीकंद पोलिस बंदोबस्तात अपर पोलिस आयुक्त, १५ पोलिस उपायुक्त, ३७ सहायक पोलिस आयुक्त, ८० पोलिस निरीक्षक, ३७९ सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, तसेच हजारो पोलिस कर्मचारी असा तब्बल चार हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात असतानाही वाहतूक कोंडी का झाली, असा सवाल उपस्थित होत आहे. लाखोंच्या गर्दीचे नियोजन करण्याची जबाबदारी असलेली यंत्रणाच दोन दिवस आधी स्वतःच्याच विळख्यात अडकली असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत लोणीकंद ते तुळापूर फाटादरम्यान दररोजच वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत असते. सोलापूर रस्त्याने थेऊरमार्गे येणारी जड वाहतूक, डंपर तसेच कारखान्यांच्या बस यामुळे या परिसरात सातत्याने वाहतूक ठप्प होते. परिणामी, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना दररोज मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
अशातच १ जानेवारीच्या मानवंदना कार्यक्रमासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणावर अनुयायी येणार असून, यावर्षी महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता आहे. आज झालेल्या वाहतूक कोंडीतून पोलिस प्रशासन धडा घेणार का आणि पुढील दोन दिवसांत प्रभावी वाहतूक नियोजन होणार का, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
बंद पडलेल्या वाहनांमुळे कोंडी
लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता, महामार्गावर काही वाहने बंद पडली होती व स्तंभ परिसरात आलेल्या अनुयायांच्या ये-जा करण्यामुळे वाहतूक कोंडी झाली. कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.