इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांना पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर टोल माफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 12:43 IST2025-09-01T12:42:48+5:302025-09-01T12:43:08+5:30
राज्य सरकाने इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१ जाहीर करून ई-वाहनांच्या वापराला चालना दिली

इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांना पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर टोल माफ
पुणे : वाढत्या प्रदूषणामुळे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवा, यासाठी राज्य सरकारने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि अटल सेतू येथून प्रवास करणाऱ्या इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांना पूर्ण टोलमाफीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरून जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना फायदा होणार आहे.
राज्य सरकाने इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१ जाहीर करून ई-वाहनांच्या वापराला चालना दिली. तसेच, केंद्र सरकारने यापूर्वीच इलेक्ट्रिक वाहनांचा वेगवान अंगीकार आणि उत्पादन (फेम) ही योजना सुरू केली होती. राज्य आणि केंद्र सरकारने जाहीर केलेल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाचा पुण्याने योग्य फायदा घेतला. त्यामुळे ई-वाहन खरेदीचा वेग वाढला. पुण्यात तर ई-वाहनांची संख्या एक लाखांच्या पुढे गेली; पण केंद्र सरकारने ई-वाहनांवरील सवलत कमी केली. त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये ई-वाहन खरेदीमध्ये घट झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१ नुसार काही महत्त्वाच्या मार्गावर टोलमाफीचा निर्णय घेतला आहे.
याबाबतचे आदेश राज्य सरकारने शुक्रवारी काढले आहेत. त्यानुसार मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू या मार्गावर प्रवास करणाऱ्या ई-वाहनांना पथकर भरण्याची आवश्यकता राहणार नाही. ई-वाहन वापरामुळे इंधन खर्चात बचत होणार आहे. तसेच, प्रदूषण नियंत्रणास मोठी मदत मिळेल, असा सरकारचा उद्देश आहे. त्यासाठी सर्व संबंधित महामार्ग प्राधिकरणांना सूचना देण्यात आल्या आहेत.