माळशेज परिसरात चिमण्यांचे प्रमाण घटले; पर्यावरणप्रेमींमध्ये चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 14:01 IST2026-03-15T14:01:15+5:302026-03-15T14:01:34+5:30
परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या मते, सकाळच्या वेळी कानावर पडणारा चिमण्यांचा किलबिलाट आता क्वचितच ऐकू येतो.

माळशेज परिसरात चिमण्यांचे प्रमाण घटले; पर्यावरणप्रेमींमध्ये चिंता
ओतूर : माळशेज परिसरात घरटी बांधून किलबिलाट करणाऱ्या चिमण्यांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या घटल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. पूर्वी गावातील कौलारू घरांच्या छपरांवर, अंगणात तसेच शेतमळ्यांमध्ये मोठ्या संख्येने आढळणाऱ्या चिमण्या आता विरळ झाल्याने पर्यावरणप्रेमी आणि ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या मते, सकाळच्या वेळी कानावर पडणारा चिमण्यांचा किलबिलाट आता क्वचितच ऐकू येतो. बदलती जीवनशैली, कौलारू घरांच्या जागी वाढणाऱ्या सिमेंटच्या इमारती, मोबाइल टॉवरमधून होणारे किरणोत्सर्जन, कीटकनाशकांचा वाढता वापर तसेच घरट्यांसाठी सुरक्षित जागांचा अभाव ही यामागील प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
शेतीत मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या रासायनिक फवारणीमुळे कीटकांचे प्रमाण घटले असून त्यामुळे चिमण्यांना अन्नाची टंचाई भासत असल्याचेही निरीक्षण व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, काही स्वयंसेवी संस्था व स्थानिक युवकांनी चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी बसविणे, पाणपोई ठेवणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणे असे उपक्रम सुरू केले आहेत. नागरिकांनी घरांच्या बाल्कनीत किंवा अंगणात धान्य व पाण्याची सोय केल्यास चिमण्यांना मोठा आधार मिळू शकतो, असे आवाहनही करण्यात येत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी चिमण्यांचे अस्तित्व अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे प्रशासनानेही जनजागृती मोहीम राबवून चिमण्यांच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पर्यावरणातील जैव साखळीतील प्रत्येक घटक महत्त्वाचा असतो. चिमणीसारख्या छोट्या पक्ष्याचे अस्तित्वही निसर्गाच्या समतोलासाठी आवश्यक आहे. वाढते नागरिकीकरण, वृक्षतोड आणि सिमेंटच्या इमारतींमुळे चिमण्यांचे निवासस्थान नष्ट होत आहे. तसेच कीटक नियंत्रणात ठेवण्यास चिमण्यांची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे चिमण्यांची संख्या घटणे हे पर्यावरणासाठी धोक्याचे संकेत असून त्यांच्या संवर्धनाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
चिमणी हा पर्यावरणाच्या आरोग्याचा महत्त्वाचा ‘इंडिकेटर’ आहे. आपल्या आसपास चिमण्या दिसेनाशा होत असतील, तर पर्यावरणात गंभीर बिघाड होत असल्याचा तो स्पष्ट इशारा आहे. चिमण्यांचे अस्तित्व संपणे म्हणजे केवळ एका पक्ष्याचे नाही, तर अन्नसाखळीतील एक महत्त्वाची कडी तुटण्यासारखे आहे. वाढते काँक्रिटीकरण, कीटकनाशकांचा अतिरेक आणि मोबाइल टॉवर्समधील अदृश्य रेडिएशन यामुळे या इवल्याशा पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आज चिमणी संकटात आहे; उद्या हीच वेळ मानवावर येऊ शकते. त्यामुळे चिमण्यांचा किलबिलाट थांबणे हा निसर्गाने दिलेला गंभीर इशारा आहे.” - रेणुका डुंबरे, सचिव, विश्व संकल्प फाउंडेशन
“पूर्वी गावोगावी ज्वारी, बाजरीसारख्या धान्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असे. या पिकांमुळे चिमण्यांना भरपूर अन्न मिळत असे. मात्र आता आधुनिक शेती पद्धती वाढल्याने या पिकांचे प्रमाण कमी झाल्याने चिमण्यांना अन्न मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे त्यांच्या संख्येतही लक्षणीय घट होत असल्याचे दिसून येते,” असे शेतकरी सांगतात. - हेमंत पा. डुंबरे, तालुकाध्यक्ष मानवाधिकार संघ