पिंक रिक्षा योजना वादात: ४०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप ?आर्थिक व तांत्रिक गोंधळ उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 09:09 IST2026-03-21T09:08:54+5:302026-03-21T09:09:45+5:30
- या योजनेत ‘ऑटो रिक्षा’ऐवजी ‘ई-रिक्षा’ देऊन मोठा बदल करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

पिंक रिक्षा योजना वादात: ४०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप ?आर्थिक व तांत्रिक गोंधळ उघड
पुणे : राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या ‘पिंक रिक्षा’ योजनेत मोठ्या आर्थिक व तांत्रिक अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी केला आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सुमारे ४०० कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेत अटी धाब्यावर बसवून लाभार्थी महिलांना निकृष्ट ई-रिक्षा देण्यात आले आहे, असा आरोप केला आहे.
या योजनेत १० हजार महिलांना स्वावलंबी करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, प्रत्यक्षात पुरवण्यात आलेल्या रिक्षा कमी क्षमतेच्या असून चढणीवर मागे येतात, तसेच अपेक्षित ११० किमीऐवजी केवळ ७०-८० किमीच धावतात. अनेक वाहनांना अद्याप आरटीओ पासिंग मिळाले नसल्याचाही आरोप करण्यात आला. या योजनेत ‘ऑटो रिक्षा’ऐवजी ‘ई-रिक्षा’ देऊन मोठा बदल करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
त्यामुळे महिलांना व्यवसाय करणे कठीण झाले असून उत्पन्न थांबले, तर कर्जाचे हप्ते मात्र सुरू असल्याने त्या अडचणीत सापडल्या आहेत. पीडित महिलांनीही निकृष्ट वाहनांमुळे अपघात आणि आर्थिक नुकसान होत आहे. या प्रकरणाची तातडीने तांत्रिक चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.