पुणे बसमध्ये डिजिटल बोर्ड बंद असल्यास कारवाई अटळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 13:32 IST2026-02-21T13:31:56+5:302026-02-21T13:32:08+5:30

- भाडे तपासणी दरम्यान तपासनिसांनीही डिजिटल बोर्ड सुरू असल्याची पडताळणी करावी

pune news today disciplinary action will be taken if the digital board is closed | पुणे बसमध्ये डिजिटल बोर्ड बंद असल्यास कारवाई अटळ

पुणे बसमध्ये डिजिटल बोर्ड बंद असल्यास कारवाई अटळ

पुणे : प्रवाशांना अचूक व वेळेवर माहिती मिळावे यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) प्रशासनाने बसमधील एलईडी (डिजिटल) मार्गदर्शक फलक नियमित सुरू ठेवण्याचे सक्त आदेश दिले आहेत. डिजिटल बोर्ड बंद आढळल्यास संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

अलीकडील काळात काही बसमध्ये डिजिटल फलक सुरू नसणे, मार्गाची माहिती अद्ययावत न करणे, तसेच पुढील व मागील मार्गफलक न लावणे याबाबत प्रवाशांकडून वारंवार तक्रारी येत होत्या. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर मुख्य वाहतूक व्यवस्थापक (ऑपरेशन) यांनी चालक, वाहक, गॅरेज पर्यवेक्षक, टाइमकीपर व आगार व्यवस्थापकांना लेखी सूचना जारी केल्या आहेत.

परिपत्रकानुसार, बस डेपोमधून मार्गस्थ होण्यापूर्वी एटीएमएस तपासणीदरम्यान एलईडी प्रणाली कार्यरत आहे का, याची खात्री करणे बंधनकारक करण्यात आले आहे. चालकांनी डिजिटल बोर्डवर योग्य बसमार्ग, प्रारंभ व अंतिम गंतव्यस्थानाची माहिती अचूकरीत्या अपडेट करणे आवश्यक आहे. याशिवाय, बस सुटताना पुढील व मागील मार्गदर्शक फलक व्यवस्थित लावले आहेत का, याची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फलक उपलब्ध नसल्यास तातडीने नवीन फलक तयार करून देण्याच्या सूचना संबंधित आगारांना देण्यात आल्या आहेत. भाडे तपासणी दरम्यान तपासनिसांनीही डिजिटल बोर्ड सुरू असल्याची पडताळणी करावी, असे नमूद करण्यात आले आहे. 

बसची नोंद ठेवून तपासणी करा

खासगी कंत्राटदारांच्या बसमध्येही डिजिटल प्रणाली कार्यान्वित नसल्यास संबंधित ठेकेदारांवर जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. तसेच, सकाळी आठ वाजल्यापासून डेपोमधून सुटणाऱ्या प्रत्येक बसची नोंद ठेवून तपासणी करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. डिजिटल फलक बंद राहिल्यास महामंडळाची प्रतिमा मलिन होत असल्याची खंत व्यक्त करत, या प्रकरणात कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Web Title : पुणे बसों में डिजिटल बोर्ड बंद होने पर होगी कार्रवाई

Web Summary : पुणे पीएमपी ने बसों में डिजिटल बोर्ड चालू रखने के सख्त आदेश दिए। अनुपालन न करने पर कर्मचारियों पर अनुशासनात्मक कार्रवाई होगी। यह गैर-कार्यात्मक डिस्प्ले और मार्ग जानकारी की गलतियों के बारे में यात्रियों की शिकायतों के बाद आया है। उचित संचालन और अद्यतन जानकारी सुनिश्चित करने के लिए निरीक्षण अनिवार्य हैं।

Web Title : Action if Digital Boards are Off in Pune Buses

Web Summary : Pune's PMP orders strict enforcement of functional digital boards in buses. Failure to comply will result in disciplinary action against staff. This comes after passenger complaints about non-functional displays and route information inaccuracies. Inspections are mandated to ensure proper operation and updated information.