एसटी बसमधील गर्दीचा गैरफायदा घेऊन प्रवाशांचे पाकीट, पर्स चोरणाऱ्या तीन महिला जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 13:33 IST2025-10-26T13:32:46+5:302025-10-26T13:33:00+5:30
- सव्वाचार लाखांचा ऐवज जप्त

एसटी बसमधील गर्दीचा गैरफायदा घेऊन प्रवाशांचे पाकीट, पर्स चोरणाऱ्या तीन महिला जेरबंद
पुणे : दिवाळीच्या सुमारास एसटीमधील गर्दीचा गैरफायदा घेऊन प्रवाशांचे पाकीट, पर्स चोरी करणाऱ्या ३ महिलांना गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने पकडले. आशा देविदास लोंढे (६०), रेखा मनोहर हातागंळे (३५) आणि हेमा दिगंबर हातागंळे (४१, सर्व रा. रेल्वे स्टेशन शेजारी, लोणी काळभोर) अशी या महिलांची नावे आहेत. त्यांच्याकडून १ हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने असा ४ लाख १२ हजार २३४ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
गुन्हे शाखेचे युनिट ४ चे पथक खडकी परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलिस अंमलदार प्रवीण राजपूत व संजय आढारी यांना बातमी मिळाली की, बसमध्ये गर्दीचा गैरफायदा घेऊन प्रवाशांचे पाकीट, पर्स चोरणाऱ्या ३ महिला वाकडेवाडी येथे पीएमपी बसस्टॉपवर थांबलेल्या आहेत. ही बातमी मिळताच पोलिस पथक वाकडेवाडी येथे गेले. त्यांनी तीनही महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी नाशिक ते इस्लामपूर एसटी बसने मोरे बाग बसस्टँड ते मांगडेवाडी एसटी बस प्रवासादरम्यान एसटी बसमधील एका महिलेची पर्स तिघींनी मिळून चोरी केल्याची कबुली दिली.
त्यांच्याकडून सव्वाचार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपासासाठी त्यांना भारती विद्यापीठ पोलिसांच्या हवाली केले आहे. ही कामगिरी एसीपी विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ४ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वैभव मगदुम, पोलिस अंमलदार राजपूत, हरीष मोरे, एकनाथ जोशी, संजय आढारी, प्रवीण भालचिम, विठ्ठल वाव्हळ, भरत गुंडवाड, मयुरी नलावडे यांच्या पथकाने केली.