तीन हल्ले, तीन बळी; पुणे-नाशिक महामार्ग ठप्प; बिबट्याला मारण्याची मागणी तीव्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 12:06 IST2025-11-04T12:05:54+5:302025-11-04T12:06:23+5:30
- मृतदेह ठेवला रुग्णालयात, अंत्यसंस्कार थांबवले : रोहन बोंबे कुटुंबीयांचा एल्गार, गायमुख फाट्यावर हजारोंचा रास्ता रोको करत वेधले शासनाचे लक्ष

तीन हल्ले, तीन बळी; पुणे-नाशिक महामार्ग ठप्प; बिबट्याला मारण्याची मागणी तीव्र
अवसरी : पिंपरखेड, जांबूत (ता. शिरूर) गावांवर सलग २० दिवसांत झालेल्या तीन बिबट्या हल्ल्यांत दोन लहान मुलांचा आणि एका आजीचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी बिबट्यासंदर्भात ठोस उपाययोजना व्हाव्यात, यासाठी त्यांनी पुणे-नाशिक महामार्गावर मंचरजवळील गायमुख फाटा येथे सोमवारी (दि. ३) रास्ता रोको आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. पालकमंत्री, वनमंत्री आणि जिल्हाधिकारी जोपर्यंत आंदोलन स्थळी येत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतल्यामुळे रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरू राहिले. यावेळी दोन पोलिस उपअधीक्षक, पाच पोलिस निरीक्षक आणि तीनशे पोलिस कर्मचारी यांचा मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.
पुणे-नाशिक महामार्गावर नंदी चौकात सकाळी ११ वाजता सुरू झालेले आंदोलन सायंकाळपर्यंत सुरू राहिले. या आंदोलनात आंबेगाव, खेड, जुन्नर व शिरूर तालुक्यांचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांची लांबच लांब रांग लागल्याने महामार्ग जाम झाला होता. स्थानिक पोलिस आणि महसूल प्रशासन घटनास्थळी तैनात राहिले आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करत होते. नागरिकांच्या नेतृत्वाखालील संघटनांमुळे आणि शेतकरी-गावकऱ्यांच्या संतप्त भावना यामुळे प्रशासनावर त्वरित कारवाई करण्याचा दबाव निर्माण झाला होता. पालकमंत्री, वनमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन थेट पाहणी करावी; बिबट्या-मानवी संघर्ष टाळण्यासाठी ठोस आराखडा तयार करावा; हा प्रश्न राज्य-आपत्ती म्हणून जाहीर करण्यात यावा. तसेच जांबूत-पिंपरखेड परिसरातील नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घालून ठार करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी या आंदोलनकर्त्यांची होती.
आंदोलन स्थळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार शरद सोनवणे, देवदत्त निकम, सुरेश भोर, विष्णू काका हिंगे, बाळासाहेब बेंडे, नीलेश थोरात, अरुण गिरे, माऊली खंडागळे, बाबू पाटे, रमेश येवले, राजाराम बानखेले, पूजा वळसे, बाळासाहेब बाणखेले, माऊली ढोमे, शरद बोंबे, धोंडीभाऊ भोर, विशाल वाबळे, प्रभाकर बांगर, बाबाजी चासकर यांसह विविध पक्षांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, युवक वर्ग, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोहन विलास बोंबे यांच्यावर रविवारी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्यामुळे पिंपरखेड व परिसरातील शेतकऱ्यांनी बोंबे कुटुंबाने पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको केला. तोपर्यंत बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळेपर्यंत तसेच जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री घटनास्थळी येईपर्यंत रोहन बोंबे यांचा मृतदेह मंचर ग्रामीण रुग्णालयात ठेवला जाईल, अशी भूमिका बोंबे कुटुंबीयांनी घेतली असून, रात्री उशिरापर्यंत अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत.
बिबट्याला मारण्याचे आदेश
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी घटनास्थळावरून जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून बिबट्या हल्ल्यांबाबत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. त्यांनी म्हटले की, लोकांच्या भावना तीव्र आहेत; तुमच्या पथकांपैकी एक पथक पोहोचला आहे, दोन अजून येण्याबाकी आहेत, त्यांना तत्काळ पाठवा. पिंपरखेडमध्ये जेवढे बिबटे आहेत, त्यांना गोळ्या ठोकाव्यात. केंद्र शासनाच्या पातळीवर मांडलेल्या विषयांमध्ये बिबट्याला शेड्यूल वन मधून बाहेर काढा आणि हा विषय शुक्रवारपर्यंतच्या बैठकीत मांडावा. बिबट्याला गोळ्या घालूनच आमचा प्रशासनावर विश्वास बसेल. अधिकाऱ्यांना किती पिंजरे लागत आहेत, त्याची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली. जिल्हाधिकारी डुडी म्हणाले की, बिबट्यांविषयी सर्व उपाययोजना केल्या आहेत, नरभक्षक बिबट्यांना मारण्याचे आदेश दिले आहेत, पिंजऱ्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे आणि केंद्रस्तरावर गुरुवार किंवा शुक्रवार रोजी बैठक होणार असून, बिबट्यांची नसबंदी आणि स्थलांतर यासाठी निर्णय होणार आहे.
आमदार शरद सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून बिबट्यांबाबत उपाययोजना शक्य आहेत का, याबाबत चर्चा केली. त्यांनी म्हटले की, बिबट्याचा प्रश्न गंभीर आहे, जुन्नर तालुक्यातही आतापर्यंत अनेकांचे बळी गेले आहेत. ते म्हणाले, "मी अनेक वर्षांपासून यासाठी संघर्ष करत आहे. आज करू, उद्या करू, या पद्धतीने काही फायदा होत नाही. यावर कायमस्वरूपी बंदोबस्त हवा. पालकमंत्री आणि वनमंत्री घटनास्थळी यायला हवेत. जोपर्यंत आंदोलन तीव्र होत नाही, तोपर्यंत त्यांना समजत नाही. शेतकऱ्यांचे जीव महत्त्वाचे आहेत, शेतकऱ्यांचा जीव जात असेल तर कायद्यात बदल करा, पण बिबट्यांचे हल्ले थांबवा. पालकमंत्री सकाळीच आंदोलन स्थळी आल्यास महाराष्ट्राने त्यांचे कौतुक केले असते," असेही शरद सोनवणे म्हणाले.
सभापती नीलेश स्वामी थोरात यांना धक्काबुक्की
आंदोलन स्थळी आंदोलन सुरू असताना आंदोलनात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या पूजा वळसे पाटील यांचे भाषण सुरू असताना त्यांनी तालुक्याचे लोकप्रतिनिधी दिलीप वळसे पाटील या ठिकाणी आले नाहीत असे म्हणत त्यांच्यावर टीका केली असता वळसे पाटलांचे निकटवर्तीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नीलेश स्वामी थोरात यांनी त्यांच्या भाषणात व्यत्यय आणल्याने आंदोलकांनी नीलेश स्वामी थोरात यांना धक्काबुक्की करत आंदोलन ठिकाणावरून बाहेर काढले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत वातावरण शांत केले.