‘त्या’ जमीन घोटाळ्याची जूनमध्येच केली होती तक्रार;७ कोटींचे महसूल बुडाले; प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 13:15 IST2025-11-08T13:10:31+5:302025-11-08T13:15:54+5:30
- या जमीन घोटाळ्यात मुद्रांक शुल्क न भरल्याची तक्रार पाच महिन्यांपूर्वीच करण्यात आली होती, तरीही महसूल प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.

‘त्या’ जमीन घोटाळ्याची जूनमध्येच केली होती तक्रार;७ कोटींचे महसूल बुडाले; प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष
वारजे : सध्या पुण्यासह राज्यात गाजत असलेल्या पार्थ पवार जमीन घोटाळ्याशी संबंधित अजून एक माहिती समोर आली आहे. या जमीन घोटाळ्यात मुद्रांक शुल्क न भरल्याची तक्रार पाच महिन्यांपूर्वीच करण्यात आली होती, तरीही महसूल प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.
कर्वेनगर येथील छावा कामगार युनियन अध्यक्ष दिनकर कोतकर यांनी ४ जून रोजी सह जिल्हा निबंधक कार्यालयाकडे या व्यवहारात मुद्रांक शुल्क न भरताच हा व्यवहार केला गेल्याची तक्रार केली व या खरेदीखतामुळे शासनाचे ७ टक्के याप्रमाणे सुमारे २१ कोटी रुपये नुकसान झाले असल्याची ती तक्रार होती. पण याबाबत कोतकर यांच्याशी महसूल प्रशासन किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातून कोणताही प्रतिसाद दिला गेला नाही.
याबाबत कोतकर म्हणाले की या व्यवहारात आपल्याला कंपनीचे नाव समजले होते. पण ही कंपनी पवार कुटुंबीयाशी संबंधित आहे याबाबत आपल्याला कोणतीही कल्पना त्यावेळेस नव्हती. नंतर या प्रकरणाशी संबंधित एकाने आपल्याशी भेटून धमकी देण्याचाही प्रयत्न केला होता. पण आपण दुसऱ्या एका मोठ्या प्रकरणात आवाज उठविण्यासाठी व्यग्र असल्याने याकडे वेळ देऊ शकलो नाही. आपल्या सामाजिक कार्यात कार्यरत असताना अनेक वेळा अशा धमकीला सामोरे गेलो आहे पण मागे हटणे मान्य नाही असे कोतकर यांनी सांगितले. हे दस्त मे महिन्यात २० तारखेला सहदुय्यम निबंधक वर्ग २, हवेली क्रमांक ४ यांच्याकडे नोंदवल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.