गाव आरोग्यसंपन्न बनणार, ५ कोटींचा पुरस्कार जिंकणार;कुठे आणि कशी करायची नोंदणी ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 14:52 IST2026-03-11T14:51:25+5:302026-03-11T14:52:36+5:30
- अभियानासाठी ग्रामपातळीपासून राज्यपातळीपर्यंत समित्या स्थापन केल्या जाणार

गाव आरोग्यसंपन्न बनणार, ५ कोटींचा पुरस्कार जिंकणार;कुठे आणि कशी करायची नोंदणी ?
- राहुल गणगे
पुणे : ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, प्रतिबंधात्मक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी राज्य सरकारने ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानात सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायतींचे तब्बल ५९ निकषांवर गुणांकन केले जाणार असून ७० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या गावांना ‘आरोग्यसंपन्न ग्राम’ म्हणून घोषित केले जाणार आहे.
या स्पर्धात्मक उपक्रमातून गावांमध्ये स्वच्छता, आरोग्य सुविधा, पोषण, लसीकरण, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि डिजिटल आरोग्य नोंदी यांना चालना मिळणार आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना राज्यस्तरावर ५ कोटी ते २ कोटी रुपयांपर्यंतचे पुरस्कार देण्यात येणार असल्याने ग्रामपंचायतींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या अभियानासाठी ग्रामपातळीपासून राज्यपातळीपर्यंत समित्या स्थापन केल्या जाणार असून ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे.
‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियान -
ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेले हे राज्यव्यापी अभियान आहे. या अंतर्गत गावातील स्वच्छता, पोषण, लसीकरण, माता-बाल आरोग्य, रोग प्रतिबंधक उपाय, पाणी व स्वच्छता सुविधा आदी घटकांवर विशेष भर दिला जाणार आहे. ग्रामपंचायतींच्या सक्रिय सहभागातून गावांचा सर्वांगीण आरोग्य विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
अभियानाचा मुख्य उद्देश काय? -
- ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा मजबूत करणे
- माता व बाल आरोग्य सुधारणा
- लसीकरणाचे शंभर टक्के लक्ष्य
- स्वच्छता, सुरक्षित पाणी आणि पोषणावर भर
- ग्रामपातळीवर आरोग्याबाबत जनजागृती वाढविणे
विविध स्तरांवर मिळणार पुरस्कार -
या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना विविध स्तरांवर पुरस्कार दिले जाणार आहेत.
राज्यस्तरावर - ५ कोटी, ३ कोटी आणि २ कोटी रुपये, याशिवाय विभागीय, जिल्हा आणि तालुका स्तरावरही स्वतंत्र पुरस्कारांची तरतूद करण्यात येणार आहे.
बहुस्तरीय समित्यांची स्थापना -
अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्राम, तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. ग्रामपंचायत प्रतिनिधी, आरोग्य विभागाचे अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी कर्मचारी तसेच स्थानिक संस्थांचा या समित्यांमध्ये समावेश असेल.
५९ विविध निकषांवर गुणांकन -
सहभागी गावांचे मूल्यांकन ५९ विविध निकषांवर केले जाणार आहे.
- स्वच्छता व कचरा व्यवस्थापन
- सुरक्षित पिण्याचे पाणी
- लसीकरणाची टक्केवारी
- माता-बाल आरोग्य सेवा
- कुपोषण नियंत्रण
- रोगप्रतिबंधक उपाय
- आरोग्य सुविधांची उपलब्धता
७० टक्क्यांवर गुण मिळविणारी गावे ‘आरोग्यसंपन्न ग्राम’ -
मूल्यांकन प्रक्रियेत ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गावांना ‘आरोग्यसंपन्न ग्राम’ हा दर्जा दिला जाणार आहे. यामुळे गावांमध्ये आरोग्य व्यवस्थेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
सर्व आरोग्य नोंदी डिजिटल स्वरूपात -
या अभियानांतर्गत गावातील नागरिकांच्या आरोग्य नोंदी डिजिटल पद्धतीने तयार केल्या जाणार आहेत. यामुळे आजारांचे वेळेवर निदान, उपचार आणि आरोग्य सेवांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.
कुठे आणि कशी करायची नोंदणी ? -
अभियानात सहभागी होण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींनी आरोग्य विभागाच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करायची आहे. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा आरोग्य विभागाकडून याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर प्रस्ताव सादर करून अभियानात सहभागी होता येणार आहे.