Pune traffic : पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच नगर रोडची कोंडी सुटेना;वाहतूक पोलिसांना नकोय जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 13:32 IST2025-09-11T12:57:47+5:302025-09-11T13:32:02+5:30

- रस्त्याच्या दोन्ही बाजूला होणारी अवैध पार्किंग, खासगी प्रवासी वाहनांचा बेशिस्तपणा कोंडीला कारणीभूत ठरत आहे

pune news the traffic jam on Nagar Road is not resolved due to police inaction; Traffic police do not want responsibility | Pune traffic : पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच नगर रोडची कोंडी सुटेना;वाहतूक पोलिसांना नकोय जबाबदारी

Pune traffic : पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच नगर रोडची कोंडी सुटेना;वाहतूक पोलिसांना नकोय जबाबदारी

- संदीप पिंगळे 

पुणे : वाहतूक पोलिसांची निष्क्रियता अन् प्रशासकीय अनास्थेमुळे नगर रोडवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच बिकट बनला आहे. याला राजकीय उदासीनता व सर्व पक्षीय पदाधिकारीही कारणीभूत आहेत. अवजड वाहनांची मोठी संख्या, भरमसाट खासगी वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र, रस्त्याच्या दोन्ही बाजूला होणारी अवैध पार्किंग, खासगी प्रवासी वाहनांचा बेशिस्तपणा कोंडीला कारणीभूत ठरत आहे. अशा बेशिस्त वाहनाधारकांकडे वाहतूक पाेलिसांचे जाणीपूर्वक दुर्लक्ष होत असून, हप्तेखोरीच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत.

चौकातील सिग्नलजवळ नो पार्किंग झोन असतानाही येरवडा ते वाघोलीदरम्यान बहुतेक चौकांत रस्त्याच्या दोन्ही बाजूने रस्त्यावरच ओला-उबेरची वाहने, रिक्षा उभ्या केल्या जातात. पुणे-अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर यादरम्यान अवैध प्रवासी वाहतूक करणारी खासगी प्रवासी वाहने, बीड, जालना, धुळ्याकडे जाणाऱ्या खासगी प्रवासी ट्रॅव्हल्स रस्त्यावर मध्येच उभ्या केल्या जातात. सकाळी व संध्याकाळी वर्दळीच्या वेळी रस्त्यावर डम्पर, टिपर, क्रेन, फोर क्लिप, मोठी काँक्रीट मिक्सर वाहने वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहेत. असे असताना वाहतूक नियोजनाऐवजी वाहतूक पोलिस केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसतात.

येरवडा येथील गुंजन चौक, शास्त्रीनगर चौक, रामवाडी मेट्रो स्टेशन, विमान नगर चौक, पाचवा मैल, टाटा गार्ड रूम, चंदन नगर येथील ९ बीआरडी चौक, खराडी-हडपसर बायपास चौक, दर्गा, जुना जकात नाका चौक ते वाघोलीपर्यंत प्रत्येक सिग्नलजवळ दोन्ही बाजूंनी बेशिस्तपणे उभी असलेली खासगी प्रवासी वाहने डोकेदुखी ठरत आहेत. पाचवा मैल येथील आयटी व काही खासगी कंपन्यांमुळे कर्मचाऱ्यांची ने-आण करणाऱ्या कॅब व बस रस्त्यातच उभ्या केल्या जातात. तसेच विरोधी दिशेने येणाऱ्या दुचाकींमुळे सकाळी व संध्याकाळच्या वेळेस वाहतुकीवर प्रचंड ताण निर्माण होतो आणि नागरिक कोंडीत अडकून पडतात.

पाचवा मैल परिसरात येरवड्याकडे येणाऱ्या मार्गाच्या कडेला चहाच्या व खाद्यपदार्थांच्या हातगाड्या आहेत. येथे ग्राहकांची व आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी असते. परंतु, त्यांची दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यातच उभी केली जातात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. चौकांच्या ठिकाणी रस्ता क्रॉसिंग बंद करून १०० ते २०० मीटर पुढे तात्पुरते निर्माण केलेले क्रॉसिंग धोकादायक ठरत आहे. त्यामुळे वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. वाहतुकीमध्ये बदल करताना रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांचा कोणताच विचार केला नसल्याने भरधाव वाहतुकीमधून जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. रामवाडी व येरवडा मेट्रोस्थानकांच्या ठिकाणी दोन्ही बाजूने प्रवासी टॅक्सी, रिक्षा यांची अनधिकृत पार्किंग, मेट्रोने येणाऱ्यांच्या प्रतीक्षेत व जाणऱ्या प्रवाशांना सोडण्यासाठी येणारी खासगी चारचाकी वाहने रस्त्यातच उभी राहतात. जवळच पीएमपीएलचा बसथांबा, अधिकृत रिक्षा स्टँड या सर्वांचा वाहतुकीवर मोठा परिणाम होत असताना नियोजनाबाबत प्रशासकीय पातळीवर असलेल्या उदासीनतेमुळे सर्वसामान्यांचा दररोजचा प्रवास अधिक खडतर व त्रासदायक बनला आहे. 

अवजड वाहने व माल वाहतूक करणाऱ्या वाहनांकडे दुर्लक्ष

गर्दीच्या वेळेस डम्पर, टिपर, मिक्सर, क्रेनसारखी अवजड वाहने नगर रोडवर येत आहेत. डम्पर व टिपरमधून क्षमतेपेक्षा अधिक खडी व क्रश सॅण्ड वाहून नेताना रस्त्यावरच ते पडते. यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास होतो. वाघोली ते येरवडा शास्त्रीनगर चौकापर्यंत रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरला आहे. दररोज विशेषत: दुचाकी वाहने घसरून अनेक लहान, मोठे अपघात होत आहेत. डम्परमधून सांडणारी क्रश थेट दुचाकीचालकांच्या डोळ्यात जात असल्याने वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. मिक्सर वाहनांमधून सिमेंट मिश्रित काँक्रीट रस्त्यावर सांडल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर उंचवटे, तर ओव्हरलोड अवजड वाहतुकीमुळे काही ठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत. 

प्रवासी कॅब, रिक्षा व खासगी अवैध प्रवासी वाहनांना रान मोकळे

आयटी कंपन्या व खासगी अस्थापनांसह मॉल, मल्टिप्लेक्समध्ये येणाऱ्यांची मोठी संख्या आहे. त्यांच्यासाठी रस्त्यावरच थांबणाऱ्या प्रवासी कॅब, रिक्षा व खासगी कार यांच्यासह येरवड्यातील गुंजण टॉकीज चौकासह शास्त्री नगर चौक, हडपसर बायपास चौकात पुणे-अहिल्यानगर दरम्यान अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने, टाटा गार्ड रूम चौक ते हडपसर बायपास चौकादरम्यान रस्त्याकडेला अवैध पार्किंग केलेल्या विविध कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेस वाहतुकीला अडथळा करत आहेत. मात्र, कारवाईबाबत दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून स्थानिक वाहतूक पोलिसांवर हप्तेखोरीचे आरोप होत आहेत.

Web Title: pune news the traffic jam on Nagar Road is not resolved due to police inaction; Traffic police do not want responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.