पुण्यात शिवनेरी बसचा चालक दारू पिताना प्रवाशांकडून रंगेहाथ पकडला;पोलिसांनी घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 13:25 IST2025-07-12T13:25:19+5:302025-07-12T13:25:46+5:30
स्वारगेट बस स्थानकावर असताना काही प्रवाशांनी चालक काही तरी विचित्र पेय पित असल्याचे पाहिले. मात्र, तो कदाचित एखादे सॉफ्ट ड्रिंक असेल असा समज करून ते शांत बसले.

पुण्यात शिवनेरी बसचा चालक दारू पिताना प्रवाशांकडून रंगेहाथ पकडला;पोलिसांनी घेतलं ताब्यात
पुणे : स्वारगेट येथून ठाण्याकडे निघालेल्या शिवनेरी बसचा चालक हा बसमध्येच दारू पित असल्याचे समोर आले आहे. ही धक्कादायक घटना आज सायंकाळी सुमारे ६ वाजता नळ स्टॉप परिसरात उघडकीस आली. मद्यधुंद अवस्थेत बस चालवणाऱ्या चालकाला प्रवाशांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
अधिकच्या माहितीनुसार, स्वारगेट बस स्थानकावर असताना काही प्रवाशांनी चालक काही तरी विचित्र पेय पित असल्याचे पाहिले. मात्र, तो कदाचित एखादे सॉफ्ट ड्रिंक असेल असा समज करून ते शांत बसले. पण बस स्वारगेटहून निघून काही अंतर गेल्यानंतर, नळ स्टॉप परिसरात चालकाने पुन्हा दारू पिण्यास सुरुवात केली. यावेळी सावध झालेल्या प्रवाशांनी बस थांबवून चालकाला चेक केलं असता तो दारूच्या बाटलीसह आढळून आला.
या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला. त्यांनी तात्काळ बस थांबवत पोलिसांना बोलावले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी संबंधित चालकाला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे. एसटी प्रशासनाकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून संबंधित चालकावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.