युतीचा निर्णय वरिष्ठांचा; भाजपच्या इतिहासामुळे स्वतंत्र तयारी;उद्धव ठाकरे गटाचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 18:24 IST2025-12-04T18:22:48+5:302025-12-04T18:24:18+5:30
आगामी पुणे महापालिका निवडणुकांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे.

युतीचा निर्णय वरिष्ठांचा; भाजपच्या इतिहासामुळे स्वतंत्र तयारी;उद्धव ठाकरे गटाचा निर्धार
पुणे : युती, आघाडीबाबतचा निर्णय पूर्णपणे वरिष्ठांचा असून पूर्वी भाजपसोबत युती असताना त्यांनी शेवटच्या क्षणी निर्णय बदलला होता. त्यामुळे स्वतंत्र तयारी ठेवत असल्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे आणि गजानन थरकुडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी निवडणूक समन्वयक वसंत मोरे आणि अनंत घरत यांच्यासह पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी पुणे महापालिका निवडणुकांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. पक्षाकडून गुरुवार (दि. ४) पासून अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज वाटपाला प्रारंभ झाला असून शहरातील शिवसेना कार्यालयात दररोज दुपारी ३ ते ६ या वेळेत अर्ज उपलब्ध राहतील. अर्जाची किंमत ५०० रुपये निश्चित करण्यात आली असून अर्ज भरताना १० हजार रुपये अनामत रक्कम जमा करावी लागणार आहे. या निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढविण्याचा निर्धार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मोरे म्हणाले, मागील काही महिन्यांपासून पक्षाने शहरातील प्रत्येक प्रभागात संघटन मजबूत करण्याचे काम केले असून, इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. प्रारंभी घेतलेल्या सर्वेक्षणात १७८ उमेदवारांनी उत्सुकता दाखवली होती; ही संख्या आता २०० च्या पुढे गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संजय मोरे यांनी राज्य सरकारवर निवडणूक प्रक्रियेतील दुटप्पी भूमिकेचा आरोप केला. सर्वोच्च न्यायालयानुसार ३१ जानेवारीपूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असतानाही सरकार संभ्रमात ठेवत आहे. नगरपालिकेच्या २२ ठिकाणच्या निवडणुका प्रलंबित आहेत ; निकाल रोखून धरले आहेत. अचानक निवडणुका जाहीर करण्याचा सरकारचा पूर्व इतिहास पाहता आम्ही पूर्वतयारीत राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.