पकडलेला बिबट्या पुन्हा या भागात सोडला जाणार नाही - गणेश नाईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 19:52 IST2025-11-12T19:50:48+5:302025-11-12T19:52:35+5:30
- गेल्या महिन्याभरात पिंपरखेड परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी आक्रमकपणे आंदोलन करत बिबट हल्ल्यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली होती.

पकडलेला बिबट्या पुन्हा या भागात सोडला जाणार नाही - गणेश नाईक
मलठण : पिंपरखेड परिसरात असणाऱ्या सर्व बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पकडलेला एकही बिबट्या पुन्हा या भागात सोडला जाणार नाही; त्याला गुजरातमधील वनतारा येथे स्थलांतरित केले जाईल; तसेच ज्या देशात बिबट्यांची कमतरता आहे, अशा आफ्रिकन देशांमध्ये हे बिबटे पाठवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
गेल्या महिन्याभरात पिंपरखेड परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी आक्रमकपणे आंदोलन करत बिबट हल्ल्यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली होती. तसचे वनमंत्र्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती जाणून घ्यावी, अशी मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी वनमंत्री गणेश नाईक यांनी बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेले शिवन्या बोंबे, भागूबाई थोरात आणि रोहन बोंबे यांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांचे सांत्वन केले.
वनमंत्री नाईक म्हणाले, “गावकऱ्यांनी जे रास्ता रोको केले, वनखात्याची वाहने जाळली, ती एक नैसर्गिक प्रतिक्रिया होती. त्यामुळे त्या प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यात येतील. पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. योग्यवेळी नियंत्रण न आणल्यास मानवी जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडे परवानगी मागवून ठोस निर्णय घेतले जातील.” तसेच बिबट्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या कुटुंबातील सदस्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, जुन्नरचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, माजी अध्यक्ष देवदत्त निकम, माजी जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके, पंचायत समितीचे डॉ. सुभाष पोकळे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, दामू घोडे, उद्योजक किसनराव उंडे, सावित्रा थोरात, गणेश कवडे, बाळासाहेब डांगे, सरपंच राजेश दाभाडे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.