‘समान पाणीपुरवठा’च्या ‘त्या’ ठेकेदाराला ५० हजारांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 11:26 IST2026-03-01T11:25:40+5:302026-03-01T11:26:08+5:30

- कामांतील दिरंगाईबाबत महापौरांनी लावली चौकशी; अभियंत्यांनी घेतला कामाच्या सद्यस्थितीचा आढावा

pune news that contractor of equal water supply fined Rs. 50,000 | ‘समान पाणीपुरवठा’च्या ‘त्या’ ठेकेदाराला ५० हजारांचा दंड

‘समान पाणीपुरवठा’च्या ‘त्या’ ठेकेदाराला ५० हजारांचा दंड

- संजय चिंचोले

पुणे :
शहरातील समान पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत जलवाहिनीच्या गुणवत्तेसह कामांत ठेकेदाराकडून होणाऱ्या दिरंगाईबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच संपूर्ण प्रशासन कामाला लागले आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांनी या प्रकरणी चौकशी अहवाल मागवला आहे. त्यानंतर समान पाणीपुरवठा प्रकल्प विभागाचे अधीक्षक अभियंता ललित बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता विनोद क्षीरसागर, उपअभियंता मुकेश पवार, कनिष्ठ अभियंता मनीषा पिसाळ यांनी समान पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत ठेकेदाराला नमूद केलेल्या सर्व कामांचा सद्यस्थितीमध्ये आढावा घेतला. त्यात बहुतांश कामे अपूर्ण अवस्थेत असल्याचा ठपका ठेकेदारावर ठेवण्यात आला आहे.

याप्रकरणी निविदा अटी-शर्तीनुसार मुदतीत राडारोडा न उचलल्याने व जॅक व पुषचे काम बंद ठेवल्याने संबंधित ठेकेदार कंपनीला ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला असून, ही दंडाची रक्कम रनिंग बिलामधून कपात करण्यास मान्यता मिळावी, असा अहवाल समान पाणीपुरवठा प्रकल्पाच्या अभियंत्यांनी मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांच्याकडे सादर केला आहे. यावर जगताप काय कार्यवाही करतात? याकडे लक्ष लागले आहे.

कार्यारंभ आदेशात नमूद केलेली कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण करणे अपेक्षित असताना ठेकेदाराकडून या कामांबाबत दिरंगाई होत असल्याचे अभियंत्यांच्या चौकशीत समोर आले आहे. यामुळे ठेकेदाराने कार्यारंभ आदेशात अटी-शर्तींच्या नियमांचा भंग केल्याचे अभियंत्यांनी चौकशी अहवालात स्पष्ट केले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याचा प्रस्ताव अभियंत्यांनी शहर पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांच्याकडे सादर केला आहे. आता ते यावर काय निर्णय घेतात? याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

‘लोकमत’च्या हाती आलेल्या अहवालानुसार, पुणे शहर समान पाणीपुरवठा प्रकल्प विभागांतर्गत पॅकेज ७ चा कार्यारंभ आदेश २२ मार्च २०२२ रोजी ठेकेदाराला देण्यात आला होता. मात्र या कामात दिरंगाई, निष्काळजीपणा व हलगर्जीपणा केल्याने त्यांना अधीक्षक अभियंता यांनी १२ नोव्हेंबर २०२५, २ डिसेंबर २०२५, १० डिसेंबर २०२५, १८ डिसेंबर २०२५, ३१ डिसेंबर २०२५ रोजी वारंवार लेखी सूचना केल्या होत्या. दरम्यान, मुख्य अभियंत्यांनी देखील ५ फेब्रुवारी २०२६ च्या आढावा बैठकीत कामासंदर्भात आदेश दिले होते. या ठेकेदारावर १३ फेब्रुवारी २०२६ रोजी कारवाईचा ठराव देखील मुख्य अभियंत्यांनी घेतला होता. इतके असूनही ठेकेदार बधत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

याठिकाणी कामात दिरंगाई

- पुणे शहर समान पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत बीएमसीसी काॅलेज रोडलगत २०० मीटर जलवाहिनी टाकण्याचे काम २ महिन्यांपूर्वीच झाले. मात्र राडारोडा तेथेच पडून आहे.

- याच मार्गावर पुढे ३२ मीटर जलवाहिनीचे काम बंद करण्यात आले होते. याठिकाणी काॅंक्रीट भरणे आवश्यक असताना ठेकेदाराने काम अपूर्णच ठेवले.

- कात्रज-कोंढवा रस्त्यावर जैन विवाह संस्था कार्यालयाजवळ ३९ मीटर लांबीत जॅक व पुषचे काम १६ दिवसांपासून बंद.

- एसआयबी चौकात १८ मीटर जलवाहिनी टाकल्यानंतर त्याठिकाणी गॅपवर्कचे पाईप शोधून दिलेल्या दिनांकापासून अद्यापपर्यंत प्रलंबित.

- कात्रज-कोंढवा रोड कोणार्क इंद्रायू येथील १८ मीटर लांबीचे गॅपवर्कचे काम मागील ६ महिन्यांपासून प्रलंबित.

ठेकेदार काम करेना, अभियंत्यांची कोंडी

पुण्यात बहुतांश भागात समान पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत जलवाहिनीची अर्धवट कामे, फुटपाथ व रस्त्यांवर खड्डे आणि राडारोडा यामुळे जागोजागी अपघाताची स्थिती निर्माण झाल्याने पुणेकर व सामाजिक संस्थांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. अभियंत्यांच्या सूचनांनुसार तक्रारीचे निवारण ठेकेदाराकडून वेळेवर केले जात नाही. तसेच निविदेतील अटी व शर्तींनुसार वेळेवर काम पूर्ण न केल्याने अभियंत्यांना पुणेकरांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

महापौरांच्या कार्यवाहीकडे पुणेकरांचे लक्ष

महापौर मंजुषा नागपुरे यांनी तडकाफडकी चौकशी समिती नेमली. अभियंत्यांनी वस्तुनिष्ठ अहवाल मुख्य अभियंत्यांकडे सादर केला आहे. या अहवालात ठेकेदाराच्या कामचुकार वृत्तीवर थेट ताशेरे ओढले आहेत. यावर आता महापौर काय कार्यवाही करतात? याकडे पुणेकरांचे लक्ष लागून आहे.

अद्याप माझ्याकडे संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी अहवाल सादर केलेला नाही. अहवाल वाचल्यानंतर मी संबंधित ठेकेदारावर योग्य ती कार्यवाही करण्याचा निर्णय घेईन. कुठलीही वस्तूनिष्ठ माहिती न घेता बोलणे उचित ठरणार नाही. - मंजुषा नागपुरे, महापौर, पीएमसी

जलवाहिनीची गळती शोधण्यासाठी हायड्रॉलिक चाचणी करावीच लागते. क्षमतेपेक्षा अधिक पाणीपुरवठा कार्यान्वित करावा लागतो. या प्रक्रियेच्या आधी जलवाहिनी स्वच्छ करण्यासाठी पाणी सोडण्यात आले होते. जलवाहिनीत बंद प्लेट ठेवण्यात आल्या होत्या. संबंधित ठेकेदार कंपनीकडून नजरचुकीने बंद प्लेट वेळीच न काढल्या गेल्याने तांत्रिक बिघाड झाला होता. जलवाहिनीची दुरुस्ती करून तातडीने रस्त्यावरचा राडारोडा उचलून रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.  - मनीषा पिसाळ, कनिष्ठ अभियंता, समान पाणीपुरवठा प्रकल्प, पीएमसी

 

या कामात आमच्या कंपनीने कुठलाही हलगर्जीपणा किंवा दिरंगाई केलेली नाही. आमच्या कंपनीला ५० वर्ष पूर्ण झालेली आहेत. आमची तिसरी पिढी या व्यवसायात आहे. आम्ही दर्जेदार काम करतो. कोणाचीही आमच्या कंपनीमार्फत सुरू असलेल्या कामांबाबत तक्रार नाही. जर महापालिका समान पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत विभागातील अधिकाऱ्यांनी आम्हाला ५० हजारांचा दंड लावला असेल तर आमच्या कंपनीचा विधी विभाग त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना उत्तर देईल. आम्ही न्यायालयाचे दार ठोठावू.  - ठेकेदार

Web Title : पुणे जल परियोजना ठेकेदार पर काम में देरी के लिए ₹50,000 का जुर्माना।

Web Summary : पुणे की समान जल आपूर्ति परियोजना के एक ठेकेदार पर देरी और लापरवाही के कारण ₹50,000 का जुर्माना लगाया गया। लोकमत की रिपोर्ट के बाद प्रशासनिक कार्रवाई हुई, जिसमें अधूरा काम सामने आया। मलबे को न हटाने और काम रोकने से संबंधित जुर्माना ठेकेदार के बिल से काटा जाएगा, जो मुख्य अभियंता के निर्णय पर निर्भर है।

Web Title : Pune water project contractor fined ₹50,000 for work delays.

Web Summary : A contractor for Pune's equal water supply project was fined ₹50,000 due to delays and negligence. Lokmat's report prompted administrative action, revealing incomplete work. The fine, related to unremoved debris and halted work, will be deducted from the contractor's bill, pending the chief engineer's decision.