नारायणपूर देवदर्शनावरून परतताना भीषण अपघात; तळेगाव ढमढेरेतील दोन युवकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 20:35 IST2025-12-16T20:34:53+5:302025-12-16T20:35:43+5:30
या अपघातात समीर व सार्थक हे दोघे गंभीर जखमी झाले, तर दिपक ढमढेरे किरकोळ जखमी झाला.

नारायणपूर देवदर्शनावरून परतताना भीषण अपघात; तळेगाव ढमढेरेतील दोन युवकांचा मृत्यू
तळेगाव ढमढेरे : नारायणपूर येथे देवदर्शनासाठी गेलेल्या युवकांच्या दुचाकीला भरधाव टेम्पोची जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात समीर संभाजी ढमढेरे (वय २१) व सार्थक विजय ढमढेरे (वय २०, दोघेही रा. तळेगाव ढमढेरे, भीमा शेत, ता. शिरूर, जि. पुणे) यांचा मृत्यू झाला आहे.
तळेगाव ढमढेरे (भीमा शेत) येथील दिपक ढमढेरे, समीर ढमढेरे व सार्थक ढमढेरे हे तिघे युवक ११ डिसेंबर रोजी दुचाकीवरून नारायणपूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन आटोपून घरी परतत असताना शिंदवणे घाटात समोरून भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात समीर व सार्थक हे दोघे गंभीर जखमी झाले, तर दिपक ढमढेरे किरकोळ जखमी झाला.
अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळी टेम्पो सोडून पळून गेला. स्थानिक नागरिकांनी तातडीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना आज दि. १६ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास समीर संभाजी ढमढेरे व सार्थक विजय ढमढेरे यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी जखमी दिपक दत्तात्रय ढमढेरे (वय २०, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी उरुळीकांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एम.एच. १२ एल.टी. ०७४६ क्रमांकाच्या टेम्पोवरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.