यवतमध्ये तणावपूर्ण शांतता; मध्यरात्री अनेकांना अटक; गावात जमावबंदी लागू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 09:34 IST2025-08-02T09:33:41+5:302025-08-02T09:34:12+5:30
- एका वादग्रस्त पोस्टमुळे दोन गटांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला. काही वेळातच परिस्थिती चिघळली आणि संतप्त जमावाने दगडफेक, वाहनांची जाळपोळ आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान

यवतमध्ये तणावपूर्ण शांतता; मध्यरात्री अनेकांना अटक; गावात जमावबंदी लागू
यवत: येथे शुक्रवारी समाजमाध्यमावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे उसळलेल्या दंगलीनंतर गावात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी कठोर कारवाई करत मध्यरात्री अनेक संशयितांना ताब्यात घेतले असून, गावात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
शुक्रवारी सकाळी एका वादग्रस्त पोस्टमुळे दोन गटांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला. काही वेळातच परिस्थिती चिघळली आणि संतप्त जमावाने दगडफेक, वाहनांची जाळपोळ आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. या दंगलीत अनेक वाहने जाळण्यात आली, तसेच काही दुकानांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
प्रशासनाची तातडीची कारवाई
घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाल्याने प्रशासनाने तात्काळ जमावबंदी आदेश लागू केला. पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी आणि पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी यवत पोलीस ठाण्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधला आणि आवश्यक मदत तसेच संरक्षण देण्याचे आश्वासन दिले. दौंड तालुक्याचे आमदार राहुल कूल यांनीही पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती घेतली आणि नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
पोलिसांची रात्रभर कारवाई
मध्यरात्रीपासून पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध सुरू केला. काही आरोपींना अटक करण्यात आली असून, इतर फरार संशयितांचा शोध सुरू आहे. गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्रशासनाचे आवाहन
प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी पोलिस आणि प्रशासन सतर्क आहे. गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.