गुंजवणी धरणातील बोट सुरू नसल्याने दहा विद्यार्थी शिक्षणापासून वंचित;राजगड तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 10:19 IST2025-07-18T10:18:57+5:302025-07-18T10:19:12+5:30
याबाबत सरपंच सुनीता खुटेकर यांनी नीरा देवधर प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना वारंवार पत्रव्यवहार करूनदेखील जलसंपदा विभाग याकडे कानाडोळा करीत आहे.

गुंजवणी धरणातील बोट सुरू नसल्याने दहा विद्यार्थी शिक्षणापासून वंचित;राजगड तालुक्यातील घटना
वेल्हे : राजगड तालुक्यातील गुंजवणी धरणात बोट सुरू नसल्याने गेवंडे परिसरातील १० मुले शाळा सुरू झाल्यापासून गैरहजर असल्याने शिक्षणापासून वंचित राहिली आहेत. याबाबत सरपंच सुनीता खुटेकर यांनी नीरा देवधर प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना वारंवार पत्रव्यवहार करूनदेखील जलसंपदा विभाग याकडे कानाडोळा करीत आहे.
गुंजवणी धरणाग्रस्तांनी गेवंडे, गेळगणी, खुटेकर वस्ती, धनगर वस्ती येथील रस्त्यासाठी आपल्या जमिनी मोबदला मिळण्याच्या अगोदर दिल्या आहेत कारण सर्व गावात रस्ता व्यवस्थित जाईल, या गावांना रस्त्यासाठी १२ कोटी निधी उपलब्ध झाला असून, या रस्त्याची टेंडर झाले असून, चार महिन्यांपूर्वी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली; पण रस्ता पूर्ण झाला नाही.
गेवंडे, गेळगणी, खुटेकर वस्ती, धनगर वस्ती येथील विद्यार्थी निवी येथील माध्यमिक विद्यालय व येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्याने गुंजवणी धरणातील बोटीचा आधार घ्यावा लागतो. दरवर्षी बोट सुरू होती. परंतु या वर्षी बोट सुरू नसल्याने अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे १६ जूनपासून विद्यार्थी शाळेत जात नाहीत. त्यामुळे येथील विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यत. संबंधित ठेकेदाराने बोट चालवून गावातील प्रवाशांची सोय करावी, अशी अट टेंडरमध्ये असूनदेखील संबंधित ठेकेदार बोट चालवित नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गेवंडे, गेळगणी, खुटेकर वस्ती, धनगर वस्ती येथील नागरिकांनादेखील दळणवळणासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नसल्याने नागरिकांचीदेखील मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. कानंद गेवंडे, घिसर काठ रस्ता जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत संबंधित ठेकेदाराने यांत्रिकी बोटद्वारे शालेय विद्यार्थी व प्रकल्पग्रस्तांची वाहतूक करणे बंधनकारक आहे. असे निविदा प्रक्रियेमध्ये स्पष्ट केले आहे. तरीदेखील संबंधित ठेकेदाराने यांत्रिकी बोट सुरू केली नाही. तरी विद्यार्थी आणि प्रकल्पग्रस्तांसाठी ताबडतोब ती बोट सुरू करावी, अशी मागणी सरपंच सुनीता खुटेकर यांनी केली आहे.
कानंद गेवंडे, घिसर काठ रस्ता ७ किलोमीटर रस्ता असून, त्यापैकी ४ किलोमीटर रस्त्याचे कच्चे काम झाले आहे. ठिकठिकाणी मोऱ्या टाकणे बाकी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रस्ता नाही, एप्रिलपर्यंत संबधित ठेकेदाराने गुंजवणी धरणात बोट चालवली होती मे महिन्यात पाणी नसल्याने बोट बंद केली. परंतु या वर्षी मे महिन्यात पाऊस चांगला झाला. विद्यार्थ्यांसाठी १६ जूनला बोट सुरू करणे आवश्यक होती. त्यामुळे येथील १० विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. - विकास कडू, माजी सरपंच, निवी गेवंडे ग्रामपंचायत