शिक्षक रस्त्यावर, मराठी शाळा वाचविण्यासाठी राज्यात गुरुवारी शिक्षकांचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 16:28 IST2025-12-04T16:28:21+5:302025-12-04T16:28:42+5:30
- संच मान्यतेमुळे शिक्षकांची पदे कमी करणे, सक्तीने सेवानिवृत्तीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन

शिक्षक रस्त्यावर, मराठी शाळा वाचविण्यासाठी राज्यात गुरुवारी शिक्षकांचे आंदोलन
पुणे/ मंचर : नवीन संचमान्यतेमुळे हजारो शाळांवरील शिक्षकांची पदे कमी करणे, दोन वर्षांत टीईटी उत्तीर्ण न झाल्यास सक्तीने सेवानिवृत्ती, तसेच ऑनलाइन अशैक्षणिक कामांचे वाढते ओझे यामुळे संतापलेल्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे. या कारणास्तव शुक्रवारी (दि. ५) जिल्ह्यातील शाळा बंद राहणार आहेत. या दिवशी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आंबेगाव तालुका शिक्षक संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष सचिन तोडकर यांनी दिली. काही काळापासून नवीन संचमान्यतेमुळे राज्यभरातील २० हजारांहून अधिक शिक्षकांची पदे कमी होणार आहेत. त्यातच १ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना टीईटी
परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याचा निर्णय जाहीर केला. शिवाय शिक्षकांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत राज्य शासनाकडून सोडवणूक नाही मिळाल्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. त्यामुळे सर्व शिक्षक संघटनांच्या माध्यमातून एकत्र येऊन राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर आक्रोश मोर्चे आयोजित करण्यात येत आहेत. त्यानुसार पुणे येथील नवीन जिल्हा परिषद कार्यालयापासून शुक्रवारी सकाळी ११ वाजता मोर्चा सुरू होईल. तो विभागीय आयुक्त कार्यालय, शिक्षण संचालक व शिक्षण आयुक्त कार्यालय या मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आक्रोश महामोर्चाच्या स्वरूपात संपेल.
या मोर्चामध्ये प्राथमिक शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक समिती, जुनी पेन्शन हक्क संघटना, शिक्षक भारती व केंद्रप्रमुख संघटना, महानगरपालिका, नगरपालिका शिक्षक संघ, माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ महामंडळ, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, मागासवर्गीय शिक्षक संघटना, शिक्षक सेना तसेच राज्यभरातील प्रमुख संघटना सहभागी होतील. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रमुख संघटनांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती तयार केली आहे.
समन्वय समितीच्या माध्यमातून राज्यभर ५ डिसेंबर रोजी शाळा बंद करण्याचे तसेच जिल्हास्तरावर मोर्चाचे आवाहन करण्यात आले असून आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष राजेंद्र शेळकंदे, एकल संघटनेचे अध्यक्ष संतोष गवारी आणि जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अध्यक्ष विनोद ढोबळे यांनी हे आवाहन केले आहे.
ऑनलाइन शैक्षणिक कामांचा भडिमार
प्रचंड ऑनलाइन शैक्षणिक कामांचा भडिमार, संचमान्यतेमुळे शिक्षक कपातीचे धोरण आणि टीईटी परीक्षा अनिवार्य केल्याने शिक्षकांवर वाढलेला तणाव यामुळे मराठी शाळा वाचवण्यासाठी संघटनेने ५ डिसेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे.
त्यामुळे शिक्षकांनी या मोर्चात 3 मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन तोडकर व सरचिटणीस सुनील भेके यांनी केले आहे.
प्राथमिक व माध्यमिक 3 स्तरावरील २८२ शाळांमधील ११५० शिक्षक या दिवशी रजेवर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.