उत्तर पुण्यात सुनेत्रा पवार सक्रिय; नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेऊन राजकीय घडामोडींचा आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 15:34 IST2026-02-14T15:32:54+5:302026-02-14T15:34:25+5:30

पुण्यातील नवीन शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीमुळे सुनेत्रा पवार यांनी प्रत्यक्षात कामाला सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Pune news Sunetra Pawar active in North Pune; Holds meeting with newly elected members to review political developments | उत्तर पुण्यात सुनेत्रा पवार सक्रिय; नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेऊन राजकीय घडामोडींचा आढावा

उत्तर पुण्यात सुनेत्रा पवार सक्रिय; नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेऊन राजकीय घडामोडींचा आढावा

पुणे : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शुक्रवारी (दि. १३) उत्तर पुण्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची बैठक घेत राजकीय घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला. पुण्यातील नवीन शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीमुळे सुनेत्रा पवार यांनी प्रत्यक्षात कामाला सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, हवेली आणि मावळ तालुक्यातील सदस्यांसोबत चर्चा करताना त्यांनी निवडणूक प्रक्रियेदरम्यान घडलेल्या घडामोडी, स्थानिक समीकरणे आणि कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर कटके, भोरचे आमदार शंकर मांडेकर, जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके, खेड-आळंदीचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील तसेच अशोक पवार यांनी भेट घेतली.

जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ७३ पैकी ५१ गटांमध्ये विजय मिळविला असून १३ पैकी ८ पंचायत समित्यांवर स्पष्ट बहुमत मिळविले आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी गटांतील समन्वय, तसेच काही ठिकाणी सुरू असलेली धुसफूस यामुळे ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

बैठकीत सुनेत्रा पवार म्हणाल्या, “अजित पवार हे कायम कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहत असत. आता तुमच्या पाठीशी कोणी नाही असे समजू नका. ज्या पद्धतीने अजितदादा काम करत होते, त्याच पद्धतीने काम केले जाईल. नवनिर्वाचित सदस्यांना प्रशासकीय कामात पूर्ण मदत केली जाईल. प्रलंबित कामांचा आढावा घेऊन ती पूर्ण करण्यात येतील.” त्यांनी पदाधिकाऱ्यांकडून निवडणुकीतील कामकाजाची माहितीही जाणून घेतली.

पक्षवाढीसाठी काम करण्याचे निर्देश

काही ठिकाणचे पराभूत उमेदवारही सुनेत्रा पवार यांना भेटले. प्रचारादरम्यान आलेल्या अडचणी, मतांतील फरक आणि स्थानिक प्रश्न यांची माहिती त्यांनी घेतली. पुढील काळात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम करण्याचे निर्देश त्यांनी दिल्याचे खेड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी पाचरणे यांनी सांगितले.

जुन्नरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र : बेनके

माजी आमदार अतुल बेनके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “जिजामातांसारखी चुणूक सुनेत्रा पवार वहिनींमध्ये दिसते. अजित पवार जसे जुन्नर तालुक्याला पाठबळ देत होते, तसेच पाठबळ त्या देतील.” तसेच “मी आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या समन्वयातून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढविल्या. पुढे काय होईल माहीत नाही; मात्र जुन्नरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित वाटचाल करतील,” असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, उत्तर पुण्यातील या बैठकीनंतर अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीपूर्वी राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title : सुनेत्रा पवार उत्तरी पुणे में सक्रिय, राजनीतिक गतिविधियों की समीक्षा।

Web Summary : सुनेत्रा पवार ने उत्तरी पुणे में राजनीतिक गतिविधियों की समीक्षा की, नव निर्वाचित अधिकारियों से मुलाकात की। उन्होंने समर्थन का आश्वासन दिया, अजीत पवार के काम को जारी रखने और लंबित मुद्दों को संबोधित करने का वादा किया। चर्चाओं में स्थानीय गतिशीलता और पार्टी को मजबूत करना शामिल था।

Web Title : Sunetra Pawar Active in North Pune, Reviews Political Developments.

Web Summary : Sunetra Pawar reviewed political developments in North Pune, meeting with newly elected officials. She assured support, promising to continue Ajit Pawar's work and address pending issues. Discussions covered local dynamics and party strengthening.