पुणे : उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम सुरू झाला असतानाही पुणे, मुंबईहून मराठवाड्यातील मार्गावर एकही उन्हाळी विशेष रेल्वे सुरू न झाल्याने प्रवाशांत तीव्र नाराजी पसरली आहे. मध्य आणि दक्षिण रेल्वेकडून दरवर्षी उन्हाळी हंगामात पुणे-नांदेड, पुणे-लातूर, पुणे-परभणी या मार्गांवर प्रवाशांची मोठी गर्दी होते. मात्र, यंदा अद्याप अतिरिक्त गाड्यांची घोषणा न झाल्याने प्रवासासाठी तिकिटे मिळवणे अवघड झाले आहे.
मुंबई-पुण्यात नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक असलेल्या मराठवाड्यातील नागरिकांची संख्या मोठी आहे. उन्हाळी सुट्टीत हे प्रवासी मोठ्या प्रमाणात गावी जातात. तसेच, मराठवाड्यातील नागरिक पर्यटनासाठी सुट्टीत जातात. त्यामुळे पुणे ते नांदेडदरम्यान धावणाऱ्या नियमित गाड्यांमध्ये वेटिंग लिस्ट लांबली असून, जनरल व स्लीपर डब्यांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. रेल्वे प्रशासनाकडून मराठवाड्यासाठी विशेष गाड्या न सोडण्यामागे मार्गावरील ताण, फलाटांची कमतरता आणि क्षमता पूर्ण झाल्याची कारणे दिली जात आहेत. मात्र, उत्तर भारताकडे मोठ्या प्रमाणावर विशेष गाड्या सोडल्या जात असताना पुणे-मराठवाडा मार्गाकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेने केला आहे.
गेल्या वर्षी पुणे-पनवेल-नांदेड तसेच इतर काही विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या. यंदाही त्याच धर्तीवर पुणे-नांदेड, पुणे-लातूर आणि पुणे-छत्रपती संभाजीनगर या मार्गांवर उन्हाळी विशेष गाड्या तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी संघटनांकडून करण्यात येत आहे.
गर्दीमुळे प्रवास त्रासदायक
सध्या पुणे-मराठवाडा मार्गावरील गाड्यांमध्ये जनरल डब्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. साधारण ७२ प्रवाशांची क्षमता असताना त्यापेक्षा दुप्पट प्रवासी प्रवास करत आहेत. उकाड्यात उभे राहून प्रवास करावा लागत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. स्लीपर कोचमध्येही वेटिंग लिस्ट मोठी असल्याने अनेकांना कन्फर्म तिकीट मिळत नाही. त्यामुळे पुणे ते मराठवाड्यातील मार्गावर अतिरिक्त गाड्या सुरू करण्यासोबतच विद्यमान गाड्यांना अतिरिक्त डबे जोडावेत, अशी मागणी केली जात आहे. उन्हाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
Web Summary : Marathwada passengers face difficulties as no special summer trains have been announced from Pune and Mumbai, despite high demand. Existing trains are overcrowded, causing hardship. Passengers urge for additional trains or coaches.
Web Summary : पुणे और मुंबई से मराठवाड़ा के लिए कोई ग्रीष्मकालीन विशेष ट्रेनें घोषित नहीं होने से यात्री परेशान हैं। मौजूदा ट्रेनें खचाखच भरी हैं, जिससे परेशानी हो रही है। यात्रियों ने अतिरिक्त ट्रेनों या कोचों का आग्रह किया।