ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांचा कहर; नागरिक दहशतीत,चिमुरडीवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 15:44 IST2026-03-20T15:44:04+5:302026-03-20T15:44:38+5:30

- चाकणच्या घटनेनंतरही आळंदीतही घडला प्रकार तरीही प्रशासन गप्प; श्वानदंशाच्या घटनांत वाढ, रस्त्यावर चालणेही धोकादायक, तीन महिन्यांत आळंदीत ५५७ जणांना चावा घेतल्याच्या घटना

pune news stray dogs wreak havoc in rural areas; Citizens in panic, child attacked | ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांचा कहर; नागरिक दहशतीत,चिमुरडीवर हल्ला

ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांचा कहर; नागरिक दहशतीत,चिमुरडीवर हल्ला

- भानुदास पहाड 

आळंदी :
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आता गंभीर संकट ठरत असून, नागरिक अक्षरशः दहशतीखाली जगत आहेत. चाकण येथे महिलेचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल दिसत नाही.

आळंदी, चाकण आणि राजगुरूनगर परिसरात रस्त्यावरून चालणेही धोकादायक बनले आहे.आळंदीतील मंडई परिसरात बुधवारी (दि. १८) सकाळी तीन ते चार भटक्या कुत्र्यांनी पाच वर्षीय परी ज्ञानेश्वर उदमाले हिच्यावर हल्ला करीत तीन ठिकाणी चावा घेतला. नागरिकांच्या आरडाओरडामुळे कुत्र्यांनी पळ काढला. जखमी चिमुरडीवर तत्काळ आळंदी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

चाकण शहरात ५ हजारांहून अधिक भटके कुत्रे असून, दरमहा एक हजाराहून अधिक श्वानदंशाच्या घटना घडत आहेत. आळंदीत साडेतीन हजारांहून अधिक कुत्र्यांचा वावर असून, दरमहा २०० ते २२० नागरिकांवर हल्ले होत आहेत. मागील तीन महिन्यांत एकट्या आळंदीत ५५७जणांना चावा घेतल्याच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत. राजगुरूनगरमध्येही साडेचार हजारांहून अधिक कुत्र्यांचा त्रास वाढला असून, दरमहा शंभराहून अधिक नागरिक जखमी होत आहेत.

नागरिकांचा सवाल : उपाय कधी?

दरवर्षी १० हजारांहून अधिक श्वानदंशाच्या घटना घडत असतानाही निर्बीजीकरण मोहीम प्रभावीपणे राबविली जात नसल्याने नागरिक संतप्त आहेत. "मानवी जिवाचा प्रश्न गंभीर असताना प्रशासन नेमके काय करीत आहे," असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कचरा आणि मांस विक्रीमुळे वाढती आक्रमकता

उघड्यावर टाकले जाणारे कचऱ्याचे ढीग आणि मांस विक्रीमुळे कुत्र्यांची आक्रमकता वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. भाविक, कामगार आणि मॉर्निंग वॉक करणारे नागरिक हे सतत दहशतीत आहेत.

'लांडग्यांचे संकरण?' भीतिदायक चर्चा

या भागातील कुत्र्यांच्या हल्ल्याची पद्धत अधिक क्रूर होत असल्याने काही ठिकाणी लांडग्यांसोबत संकरण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. टोळी करून हल्ला करणे, शरीरयष्टी व वर्तनातील बदल यामुळे ही शक्यता व्यक्त केली जात आहे.

आरोग्य यंत्रणा सतर्क

"खेड तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये श्वानदंशावरील लस उपलब्ध आहे. नागरिकांनी तत्काळ सरकारी रुग्णालयात उपचार घ्यावेत," असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विलास माने यांनी सांगितले. 

Web Title : ग्रामीण इलाकों में आवारा कुत्तों का कहर; नागरिक दहशत में, बच्ची पर हमला

Web Summary : पुणे के ग्रामीण इलाकों में आवारा कुत्तों का आतंक बढ़ रहा है। आलंदी, चाकण और राजगुरुनगर में हमले बढ़ रहे हैं, जहाँ हर महीने सैकड़ों लोग काटे जा रहे हैं। हाल ही में एक पाँच साल की बच्ची पर हमला हुआ। अधिकारियों ने काटने के बाद तुरंत टीकाकरण कराने का आग्रह किया। नागरिक प्रभावी नसबंदी कार्यक्रम की मांग कर रहे हैं।

Web Title : Stray dog menace in rural areas; citizens in fear, child attacked.

Web Summary : Rural Pune faces a stray dog crisis. Attacks are rising in Alandi, Chakan, and Rajgurunagar, with hundreds bitten monthly. A five-year-old was recently attacked. Authorities urge immediate vaccination after bites. Citizens demand effective sterilization programs.