Pune Crime: बहिणीकडे राहायला जातात म्हणून मुलाकडून वडिलांना बुटांनी मारहाण;उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 11:01 IST2025-07-19T11:00:41+5:302025-07-19T11:01:02+5:30
वडिलांच्या मृत्यूनंतर फरार झालेल्या मुलाला नारायणगाव पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली आहे.

Pune Crime: बहिणीकडे राहायला जातात म्हणून मुलाकडून वडिलांना बुटांनी मारहाण;उपचारादरम्यान मृत्यू
नारायणगाव - "तुम्ही बहिणीकडे चाकणला राहण्यास का जाता?" या कारणावरून मुलाने वडिलांना बुटांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला. ही घटना जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी येथे घडली. वडिलांच्या मृत्यूनंतर फरार झालेल्या मुलाला नारायणगाव पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली आहे.
गणेश ज्ञानेश्वर खंडागळे (वय ३८, रा. खंडागळे मळा, मांजरवाडी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने वडील ज्ञानेश्वर नाथा खंडागळे (वय ५५) यांना बुटांनी मारहाण केली होती. या मारहाणीत ज्ञानेश्वर खंडागळे गंभीर जखमी झाले होते.
अधिकच्या माहितीनुसार, नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश खंडागळे याने "तुम्ही बहिणीकडे चाकणला राहायला का जाता?" असे म्हणत वडिलांना शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर त्यांना खाली पाडून छातीवर, पोटावर आणि डोक्यावर बुटांनी जोरजोरात लाथा मारल्या. गंभीर जखमी असलेल्या ज्ञानेश्वर खंडागळे यांना ससून हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असता ते उपचारादरम्यान मृत्यूमुखी पडले.
या घटनेबाबत १६ जुलै रोजी सायंकाळी ६:५७ वाजता नारायणगाव पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ कलम ११८ (१), ११८ (२), ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३५१ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गुन्ह्यामध्ये बीएनएस कलम १०३ वाढवून फरार झालेल्या गणेश खंडागळे यास पोलिसांनी २४ तासांत अटक केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.