पुण्यात बांगलादेशी ठरवून माजी सैनिकाच्या घरासमोर घोषणाबाजी; नेमकं काय आहे प्रकरण ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 09:57 IST2025-07-31T09:57:41+5:302025-07-31T09:57:55+5:30
- कथित संघटनेविरुद्ध कारवाईची पोलिस आयुक्तांकडे मागणी

पुण्यात बांगलादेशी ठरवून माजी सैनिकाच्या घरासमोर घोषणाबाजी; नेमकं काय आहे प्रकरण ?
पुणे : बांगलादेशी ठरवून माजी सैनिकाच्या घरासमोर एका संघटनेने घोषणाबाजी करून गोंधळ घातल्याची घटना चंदननगर भागात नुकतीच घडली. या प्रकरणी संबंधित संघटनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध कारवाईची मागणी नॅशनल काॅन्फरन्स ऑफ मायनाॅरिटिज या संघटनेकडून पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे बुधवारी करण्यात आली.
माजी सैनिकांच्या घरासमोर घोषणाबाजी करणे, तसेच गोंधळ घालण्याची कृती खेदजनक आहे. या प्रकरणी चाैकशी करून संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. चंदननगर भागात माजी सैनिक कुटुंबीयांसह राहायला आहे. २६ जुलैला रात्री काही संघटनांचे कार्यकर्ते तेथे गेले. त्यांनी माजी सैनिकांच्या घरासमोर घोषणाबाजी केले. सैनिक, तसेच त्याच्या कुटुंबीयांना बांगलादेशी असे संबोधिले. या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी नॅशनल काॅन्फरन्स ऑफ मायनाॅरिटिज या संघटनेकडून करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष राहुल डंबाळे, ॲड. असीम सरोदे, वसीम सय्य्द, अफजल खान, अझहर खान, मुफ्ती शाहीद, ॲड. तौसिफ शेख यावेळी उपस्थित होते.
शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन दिले. सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील यावेळी उपस्थित होते. ही घटना खेदजनक आहे. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, तसेच समाजात विद्वेष पसरविणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.