पुणे-मुंबई रेल्वे वेळापत्रकामध्ये सहा तासांची दरी; तासाला एक गाडी हवी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 15:53 IST2026-03-11T15:52:08+5:302026-03-11T15:53:02+5:30

- सध्या पुण्यातून मुंबईकडे सकाळच्या वेळेत काही प्रमुख गाड्या उपलब्ध आहेत.

pune news six-hour gap in Pune-Mumbai railway schedule; one train per hour needed | पुणे-मुंबई रेल्वे वेळापत्रकामध्ये सहा तासांची दरी; तासाला एक गाडी हवी 

पुणे-मुंबई रेल्वे वेळापत्रकामध्ये सहा तासांची दरी; तासाला एक गाडी हवी 

पुणे : राज्यातील सर्वाधिक वर्दळीच्या रेल्वे मार्गापैकी एक असलेल्या पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर सकाळी साडेनऊनंतर तब्बल सहा तास पुण्यातून थेट गाड्या नसल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

वाढती प्रवासी संख्या, नोकरी-व्यवसायासाठी होणारी नियमित ये-जा आणि वाढती मागणी लक्षात घेता सकाळी साडेनऊनंतर किमान दर एक ते दोन तासांनी मुंबईसाठी रेल्वे सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटना व नियमित प्रवाशांकडून होत आहे. सध्या पुण्यातून मुंबईकडे सकाळच्या वेळेत काही प्रमुख गाड्या उपलब्ध आहेत. सिंहगड एक्स्प्रेस (६:०५), डेक्कन क्वीन (७:१५), प्रगती एक्स्प्रेस (७:४५) आणि वंदे भारत एक्स्प्रेस (९:२०) या गाड्यांमुळे सकाळी प्रवास करणाऱ्यांची सोय होते.

मात्र, त्यानंतर पुण्यातून थेट मुंबईकडे जाणारी पुढील गाडी दुपारी ३:१५ वाजता डेक्कन एक्स्प्रेस आहे. त्यामुळे सकाळी साडेनऊ ते दुपारी सव्वातीन असा सुमारे सहा तासांचा मोठा खंड पडतो. या काळात रेल्वे उपलब्ध नसल्याने प्रवाशांना एसटी बस, खासगी कॅब किंवा इतर पर्यायांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहनांची संख्यादेखील वाढते.

बाहेरून येणाऱ्या काही लांब पल्ल्याच्या गाड्या या मार्गावरून जात असल्या तरी त्या आधीच गर्दीने भरलेल्या असल्यामुळे तिकीट मिळणे कठीण होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या वेळेत अतिरिक्त इंटरसिटी किंवा विशेष गाड्या सुरू करून वेळापत्रकातील दरी भरून काढावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

तिसरी-चौथी मार्गिका कधी ?

पुणे-मुंबईदरम्यान तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. अर्थसंकल्पात घोषणादेखील झाली असली तरी प्रत्यक्ष काम अद्याप सुरू झालेले नाही. या मार्गिका सुरू झाल्यास गाड्यांची संख्या वाढवणे आणि प्रवाशांची सोय करणे शक्य होणार आहे. रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होण्यासही मदत होईल.

 पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. सकाळच्या वेळेत गाड्या असल्या तरी दुपारच्या टप्प्यात मोठी पोकळी आहे. त्यामुळे साडेनऊनंतर किमान एक ते दोन तासांनी गाडी सुरू करणे गरजेचे आहे. - आनंद सप्तर्षी, सदस्य, विभागीय रेल्वे सल्लागार समिती  

Web Title : पुणे-मुंबई रेल समय सारणी में छह घंटे का अंतर: सीधी सेवा नहीं

Web Summary : पुणे-मुंबई रेल सेवाओं में सुबह 9:30 बजे के बाद छह घंटे का अंतर है, जिससे यात्रियों को असुविधा हो रही है। यात्रियों की उच्च मांग के कारण हर एक से दो घंटे में ट्रेनों की मांग है। भीड़ कम करने के लिए तीसरी और चौथी रेलवे लाइन की जरूरत है।

Web Title : Pune-Mumbai Train Schedule Gap: Six Hours Without Direct Service

Web Summary : A six-hour gap exists in Pune-Mumbai train services after 9:30 AM, inconveniencing commuters. Passengers demand trains every one to two hours due to high demand. The third and fourth railway lines are needed to alleviate congestion.