कर्वे रस्ता व्हीआयपी केव्हापासून झाला? कोणाच्या आदेशाने झाला ? मनसेची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 16:10 IST2025-09-01T16:09:52+5:302025-09-01T16:10:19+5:30
केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्या शनिवारच्या दौऱ्यात याच पद्धतीने पोलिसांनी नड्डा येण्याच्या आधी सर्व दुकानांमध्ये जाऊन ग्राहकांनी त्यांची वाहने काढावयास लावली. दुसरीकडे कुठेही लावा, इथे लावायची नाही, हा व्हीआयपी रस्ता आहे, असे अतिशय अरेरावीने वाहतूक शाखेचे अधिकारी ग्राहक व दुकानदारांबरोबर बोलत होते

कर्वे रस्ता व्हीआयपी केव्हापासून झाला? कोणाच्या आदेशाने झाला ? मनसेची टीका
पुणे : कर्वे रस्ता व्हीआयपी रस्ता आहे, असे सांगत वेगवेगळ्या नेत्यांच्या दौऱ्यावेळी पोलिस रस्त्याच्या बाजूला असलेल्या व्यावसायिकांना त्यांच्या दुकानांमध्ये असलेल्या ग्राहकांची वाहने दुसरीकडे लावण्यास सांगतात. हा रस्ता व्हीआयपी कधीपासून झाला, कोणाच्या आदेशाने झाला, असे प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वाहतूक शाखेला विचारले आहेत.
मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत संभूस यांनी वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांना पत्र पाठवून याबाबत संताप व्यक्त केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्या शनिवारच्या दौऱ्यात याच पद्धतीने पोलिसांनी नड्डा येण्याच्या आधी सर्व दुकानांमध्ये जाऊन ग्राहकांनी त्यांची वाहने काढावयास लावली. दुसरीकडे कुठेही लावा, इथे लावायची नाही, हा व्हीआयपी रस्ता आहे, असे अतिशय अरेरावीने वाहतूक शाखेचे अधिकारी ग्राहक व दुकानदारांबरोबर बोलत होते, असे संभूस यांनी सांगितले.
खंडूजीबाबा चौक ते नळस्टॉप या भागात दोन्ही बाजूंना व्यावसायिकांची दुकाने आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना, दुकानांच्या बाहेर अधिकृतपणे वाहने लावता येतात. असे असताना काही वर्षांपूर्वी वाहतूक शाखेने या ठिकाणी वाहने लावू नयेत, असे फर्मान काढले होते. सर्व दुकानदारांनी एकत्रितपणे याविरोधात लढा दिला व पोलिसांना त्यांचे फर्मान मागे घेणे भाग पाडले. आता पुन्हा एकदा तोंडी आदेश आहे, असे सांगून दुकानदारांना त्रास दिला जात आहे. मुळातच वाहतूककोंडी होत असलेल्या रस्त्यावर नेत्यांचे दौरे ठेवणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे डोके तपासायला लावणे गरजेचे आहे, अशी टीका संभूस यांनी केली.
कोणताही व्हीआयपी दौरा असेल, तर त्याची पूर्वकल्पना दुकानदारांना देणे गरजेचे आहे. कोणाच्याही तोंडी आदेशाने एखादा रस्ता व्हीआयपी होत नाही. त्यामुळे यापुढे अशा पद्धतीने जबरदस्ती करत व्यावसायिकांना त्यांच्या दुकानात जाऊन तिथे असलेल्या ग्राहकांच्या गाड्या काढण्यास सांगू नये, तसे झाल्यास मनसेच्या वतीने त्याविरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा संभूस यांनी पाटील यांना पाठवलेल्या पत्रात दिला आहे.